अलोरे येथील कोयना प्रकल्पातील केंद्रावर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मानसिक ताणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
कोयना प्रकल्पाच्या ईव्हीटीवर कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी सुनील पाटील (वय ३५ वर्षे, मूळ सातारा, सध्या शिरगाव) यांनी सोमवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास मानेवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गेली सुमारे आठ वर्षे पाटील पोलीस दलामध्ये नोकरी करत होते. गेल्या दोन वर्षांंपासून ते अलोरे येथे कार्यरत होते. कोयना प्रकल्प केंद्रावर नेमणुकीचा सोमवारी त्यांचा पहिलाच दिवस होता. त्यांचे सहकारी गायकवाड दुपारी जेवणासाठी गेल्यानंतर त्यांनी बंदूकीची गोळी झाडून आत्महत्या केली. गायकवाड जेऊन आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी अलोरे — शिरगाव पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यावर मृतदेह बाहेर आणण्यात आला. तेव्हा पाटील यांनी दोन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. रात्री उशिरा या घटनेची नोंद अलोरे—शिरगाव पोलीस स्थानकात करण्यात आली. एक गोळी छातीतून आरपार होऊन भिंतीवर आदळल्याची खूण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड रात्री उशिरा शिरगाव पोलिस ठाण्यात आले. त्यांनी या प्रकाराची चौकशी केली. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही वर्षांंपासून पाटील मणक्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती पूर्णपणे ढासळल्याने ते खचलेही होते. त्यांचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला असून त्यांना सात महिन्यांचा मुलगाही आहे. ते पी व मुलासह शिरगाव येथे रहात होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पत्नीला व मुलाला कोल्हापूर येथे पाठवले आहे. पी येथे नसताना त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येला आजारपणाचे किंवा मानसिक ताण—तणावाचे कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आत्महत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर कोल्हापूर येथील त्यांचे नातेवाईक सोमवारी रात्रीच शिरगावला दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन ते गावी गेले. तेथे मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.