बीड : धनंजय मुंडे यांची पक्षनिष्ठा मला माहीत आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते. एवढेच नाही तर आष्टी आणि गेवराई मतदारसंघातसुद्धा त्यांची पक्षनिष्ठा जगजाहीर आहे. जीवनात त्यांनी कोणाची निष्ठा ठेवली, हे एकदा सांगावेच, असे म्हणत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले.
बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे म्हटले होते. याला उत्तर देताना धनंजय मुंडेंना राजकारणात कोणी आणले, हे त्यांनी सांगावं. फार मोठ झाल्यासारखं त्यांना वाटत असल्यास जमिनीवर पाय ठेवून बोलावं आणि पक्षनिष्ठाच्या गप्पा त्यांनी मारूच नयेत, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
एकाच पक्षाचे असताना दोन ओबीसींचे उमेदवार माझ्या विरोधात त्यांनी मतदारसंघात उभे केले होते. इतकेच नाहीतर गेवराई मतदार संघातही विजयसिंह पंडितांच्या विरोधात आणि आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी उमेदवार उभे करण्यात आल्याचा आरोपही सोळंके यांनी केला. आमच्याविषयी बोलताना त्यांनी सांभाळून बोलावे, कारण मी पाच वेळचा आमदार आहे.
शिवाय विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या वडिलांच्या काळापासून राजकारणात आहेत. मुंडे यांचा जन्मही झाला नसेल, तेव्हापासून पंडित कुटुंब राजकारणात आहे. यामुळे मुंडेंचा अभ्यास कमी आहे, असेही सोळंके म्हणाले.
भुजबळांनी मंत्रिपद सोडावे
ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ जे बोलले ते कितपत योग्य आहे, कारण ते मंत्री आहेत. मंत्रिमंडळामध्ये असताना हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय कॅबिनेटने घेतला. त्यामुळे त्यांनी मंत्रिपद सोडून बोलावे, असा सल्लाही प्रकाश सोळंके यांनी दिला.