कराड : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भास्करराव शिंदे यांचे पुत्र मनोहर शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठांशी सल्लामसलत केल्यानंतर आज सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेवून भाजपच्या सत्तेच्या माध्यमातून मलकापूर शहराचे हित साधणार असल्याचे सांगितले. भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा रंगताना, शिंदेंच्या भूमिकेवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या मनोहर शिंदे या नेतृत्वाची गेले दोन दशकांहून अधिककाळ मलकापूर शहरावर सलग सत्ता राहिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसच्या माध्यमातून मलकापूरला शेकडो कोटींचा भरघोस निधी आणण्याचे कसब त्यांनी दाखवले. काँग्रेसचे दीर्घकाळ तालुकाध्यक्ष असलेल्या मनोहर शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांचे शिलेदार म्हणून राजकारणात दबदबाही होता.

त्यांचे वडील भास्करराव हे तर, निवडणूक न लढवता पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री खासदार प्रेमलाकाकींच्या आशीर्वादाने सन १९८२ ते १९९४ अशी १२ वर्षे (सलग दोनदा) विधानपरिषदेचे आमदार झाले. त्यामुळे मलकापूरचे हे शिंदे म्हणजे चव्हाणांचे उजवे हात आणि काँग्रेसचे निष्ठावंत, अशीच त्यांची ओळख. आणि आता याच शिंदे कुटुंबाने सात दशकांच्या प्रवासानंतर चव्हाणांना पाठ आणि काँग्रेसला निरोपाचा हात दाखवल्याने भाजपला बळ मिळताना, नवी राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. शिंदेंनी सत्ता आणि स्वतःच्या फायद्यासाठी विचारांची प्रतारणा आणि काँग्रेसशी बेईमानी केल्याची टीका काँग्रेस जणांकडून होत आहे.

मनोहर शिंदे हे भाजपत जाणार असल्याच्या चर्चा अलीकडे रंगल्या. मात्र, ते स्वतः याचा स्पष्टपणे इन्कार करत होते. असे असताना, मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे मनसुबे नेमकेपणाने उघड झाले. शिंदे हे प्रथम आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या समवेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे यांच्याशी बोलणी करून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटल्याने ‘गेला मनोहर कुणीकडे’ हे चित्र अधोरेखित झाले.

आजच्या पत्रकार परिषदेत मनोहर शिंदे यांनी मलकापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण सत्तेच्या प्रवाहात जात असल्याचे ठासून सांगितले. मात्र, निष्ठा, स्वार्थ, सत्ता अन् गद्दारी या अंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते गोंधळले. शिंदेंनी भावनिक भाष्य करून मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी पत्रकारांची शाब्दिक चकमक उडाली. अनेक प्रश्नांना त्यांना समर्पक उत्तरे देता न आल्याने उपस्थित शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आपआपसातील चर्चेचा गोंगाट वाढवून ही पत्रकार परिषद अर्ध्यावरच गुंडाळली.