राहाता : आणीबाणी विरोधातील संघर्षात विचारांच्या आधारावर लोकतंत्रसेनानी लढल्यामुळेच या देशातील संविधान आणि लोकशाही जिवंत राहू शकली. संविधान हा देशाचा आत्मा असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले मुलभूत आधिकार हीच लोकशाहीची ताकद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
आणीबाणी विरोधातील संघर्षाला ५० वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून माजी खासदार स्व. सुर्यभान पाटील वहाडणे प्रतिष्ठानने आणीबाणी विरोधात लढा देत कारावास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा तसेच त्यांच्या वारसदारांचा सन्मान मंत्री विखे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथे करण्यात आला. वाल्मिकराव भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव वहाडणे, विनायक गायकवाड, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते रवीकाका बोरावके तसेच भाजप आणि संघ परिवारातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विखे म्हणाले, की तत्वाशी कोणतीही तडजोड न करता, अतिशय धैर्याने आपण आणीबाणी विरोधातील लढाईत कार्यकर्ते एकसंघ उभे राहीले. त्याची कृतज्ञता या कार्यक्रमातून व्यक्त करण्याची संधी मिळाली. आज विचारांच्या आधारावर देश विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र सेनानींनी मजबूत केल्यामुळेच देशाच्या लोकशाहीचे मंदिर अतिशय समर्थपणे उभे आहे. जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार असा नकारात्मक संदेश देशामध्ये पसरविले जातात. मात्र यातून विरोधकांना काहीही साध्य होणार नाही. कारण त्यांचे नेते विदेशात जावून भारताच्या संविधानावर टिका करतात, असे विखे म्हणाले.