अलिबाग : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात अलिबाग ७१ मिमी, पेण ६३ मिमी, म्हसळा १५८ मिमी, माणगाव ३७ मिमी, उरण ८२ मिमी, श्रीवर्धन १३५ मिमी, खालापूर ७२ मिमी, रोहा ४० मिमी, पोलादपूर १२८ मिमी, मुरुड ५० मिमी, सुधागड ३४ मिमी, तळा ४८ मिमी, पनवेल १४१ मिमी, महाड ७९ मिमी, कर्जत ७२ मिमी तर माथेरान येथे ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका आणि अंबा नद्यांनी सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा आणि नागोठणे परिसराला पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यात सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे आणि वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या आहेत.

मुळशी, रवाळजे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भीरा जलविद्यूत प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, प्रतिसेकंद ६२ घन मीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पातळीत आणखिन वाढ होण्याची शक्यता आहे. सावित्री, पाताळगंगा आणि उल्हास नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी २ हजार ३१३ मिलीमीटर पाऊस पडतो, त्या तुलनेत यंदा १ हजार ५५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात ६७ टक्के पाऊस पडला आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षी याच १५ ऑगस्ट पर्यंत २ हजार ३७२ मिलीमीटर पाऊस पडला होता. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.