अलिबाग -सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. अतिवृष्टीमुळे रोहा आणि नागोठणे परिसराला पुराचा तडाखा बसला आहे. मिठेखार येथे दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जनजिवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होती.

रायगड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अंबा आणि कुंडलिका नद्यांना पूर आला. तर सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली. जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात पूरस्थिती कायम होती. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकूण ५३ घरांची पडझड झाली. ३० गुरांच्या गोठ्यांचे तर एका सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले.

मरुड तालुक्यात मिठेखार गावात दरड कोसळून विठाबाई गायकर या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने, नागोठणे येथील मच्छीमार्केट, बस स्थानक, बाजार पेठ, मरिआई मंदिर परिसरात परिसरात पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. वाकण पाली मार्ग पूरस्थितीमुळे बंद करण्यात आला होता. सावित्री नदीही दुपारी इशारा पातळीवरून वाहत होती.

रोहा तालुक्यातील कोलाड, खांब परिसरातील सखल भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. रोहा शहरातील दमखाडी परिसरात नदीचे पाणी शिरले होते. तामिळनाडू राज्यातून आलेले १५ पर्यटक खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर पर्यटनासाठी आले होते. पण पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे सर्वजण अडकून पडले होते. हेल्प फाऊंडेशनच्या बचाव पथकांनी त्यांची सुटका केली.

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, मंगळवारी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या रेड अलर्ट जारी केल्याने वरंध घाट आणि अंबेनळी घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर मुंबई गोवा महामार्गावरील कळमजे पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक निजामपूर मार्गे वळवण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील पटेल मोहल्ला येथील १५४ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर माणगाव येथील १३८, रोहा येथील ९२, तळा येथील ११ तर पोलादपूर येथील १०५ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. दरम्यान बुधवारी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १८८ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान येथे झाली. तिथे २४ तासात तब्बल २५४ मिलिमीटर पाऊस पडला, म्हसळा, तळा, माणगाव, श्रीवर्धन, रोहा या तालुक्यांमध्ये २०० मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद झाली. अलिबाग, पेण येथे १९० मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात मुरुड तालुक्याचा अपवाद सोडला तर इतर १४ तालुक्यांमध्ये १०० मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. आजही पावसाचा जोर कायम आहे.