अलिबाग– मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी कोकणात यंदा पवसाला सरासरी गाठता आलेली नाही. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कोकणात यंदा ९७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तिनही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे.
कोकणात दरवर्षी साधारणपणे २ हजार ८६८ मिमी पाऊस पडतो, यावर्षी २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. म्हणजेच यावर्षी पावसाला सरासरी पर्जन्यमान गाठता आलेले नाही. कोकणात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद पालघर जिल्ह्यात झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस रायगड जिल्ह्यात नोंदवला गेला आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात ११० टक्के, ठाणे जिल्ह्यात १०७ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ९७ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८३.९ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. रायगड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १६.१ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत कोकणात कितीतरी जास्त पाऊस पडतो. मात्र यावर्षी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेत कमी पाऊस पडला आहे. असे असेले कमी पावसाचा कुठलाही परिणाम कोकणात दिसून येणार नाही. कारण समाधानकारक पावसामुळे कोकणातील पिक परिस्थिती राज्यातील इतर भागातील शेतीच्या तुलनेत कितीतरी चांगली आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात जुन ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी २ हजार ४३३ मिमी पाऊस पडतो, त्या तुलनेत यंदा २ हजार ६०७ मिमी पावसाची नोंद झाली, रायगड जिल्ह्यात ३ हजार १४८ मिमी पाऊस पडतो, त्या तुलनेत यंदा २ हजार ६४० मिमी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ३ हजार १९७ मिमी पाऊस पडतो, त्या तुलनेत यंदा ३ हजार १०३ मिमी पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान २ हजार ९४० मिमी आहे. त्या तुलनेत यंदा २ हजार ७९० मिमी पाऊस झाला आहे.
पालघर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी २ हजार ३०५ मिमी आहे. त्या तुलनेत यंदा २ हजार ५५६ मिमी पाऊस पडला आहे. कोकणातील पाच जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी ही २ हजार ८६८ मिमी येवढी आहे. त्या तुलनेत यंदा २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेल्याची नोंद झाली आहे. राज्यसरकारच्या कृषी विभागाने मंहारेन या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.