पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यासारखं होतं असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी बोला काय विचारु ? असं विचारत असल्याचं दाखवलं आहे. एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी मुलाखतीचं सर्व वातावरण मोदीमय दाखवलं आहे.

नुकतंच नरेंद्र मोदी यांनी एएनआयला प्रदीर्घ मुलाखत दिली असून यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांना नरेंद्र मोदी यांनी तब्बल 95 मिनिटांची मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदी, गांधी घराणं, उर्जित पटेल राजीनामा, जीएसटी, काळा पैसा, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अशा विविध विषयांवर मतं मांडली. तसेच 2019 मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरच विश्वास दाखवतील असंही मोदी म्हणाले होते.

मात्र मुलाखतीचे प्रश्न आधीपासूनच ठरले होते अशी टीका विरोधक करत आहेत. मोदींची मुलाखत झाल्यानंतर लगेचच काँग्रेसने पत्रकार परिषद घेत ही मुलाखत म्हणजे फक्त मीपणा होता अशी टीका केली होती.

मोदींच्या मुलाखतीचे वादळ चहाच्या पेल्यातलेच: शिवसेना
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती, अशा शब्दात शिवसेनेने मोदींच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही, असेही पक्षाने म्हटले आहे.