सोलापूर : रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा दुसऱ्याला संपविण्यासाठी खड्डा खोदतो, तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो. हीच परिस्थिती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले व्यक्त केली आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश होऊन ग्रामविकास खात्याचा पदभार हाती घेतल्यानंतर जयकुमार गोरे हे एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपामुळे अडचणीत सापडले होते. संबंधित महिलेने गोरे यांनी आपणांस अश्लील छायाचित्रे पाठविल्याचा आरोप केला होता. परंतु नंतर संबंधित महिलेला याच प्रकरणात एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. या अगोदर तीन जणांना अटक झाली होती.या प्रकरणातील संबंधित महिलेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांचे भ्रमणध्वनीवर संभाषण झाल्याचे उजेडात आले होते. त्यानुसार पोलिसांनी रामराजे निंबाळकर यांची साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सोलापुरात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, एका महिलेच्या माध्यमातून आपल्या विरुद्ध षड्यंत्र रचले गेले होते. यातून खऱ्या अर्थाने एखाद्याचा किती द्वेष करावा याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले. रामराजे यांनी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचे काम केले. माझ्याबाबतही गेली १७ वर्षे त्रास देण्याचे काम केले आहे.

आता तर त्याने कळस गाठला होता. रामराजे यांनी आयुष्यभर ‘शकुनी मामा’ चे काम केले. आता परिस्थिती त्यांच्यावरच उलटली आहे. त्यांनी केलेल्या कट कारस्थानाच्या सगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. आपल्या विरोधात एका महिलेला पुढे करून कोणी कसा कट रचला, पैसे कोणाला आणि कोणी द्यायचे, तेही समोर आले आहे. याबाबत पोलीस संपूर्ण चौकशी करतील, असे गोरे यांनी स्पष्ट केले.