Ramdas Athawale on Marathi vs Non-Marathi Language Row : देवेंद्र फडणवीस सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली. तसेच राज्यातील जनतेच्या विरोधानंतर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) व मनसेने विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दोन्ही पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून मराठी माणसांच्या एकजुटीची हाक दिली आहे. परंतु, याच मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘मराठीबाबत आपणच अधिक आक्रमक’ हे दाखवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत.

या आंदोलनांच्या माध्यमातून मनसे व शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांकडून राज्यातील अमराठी नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांना त्रास दिल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत. ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातील आक्रमक आंदोलनांवर नाराजी व्यक्त केली आहे.

रामदास आठवले काय म्हणाले?

रामदास आठवले यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुंबईत भाषेच्या नावाखाली चालू असलेली दादागिरी ताबडतोबत थांबली पाहिजे. आपल्या सर्वांनाच मराठी भाषेचा अभिमान आहे. परंतु, एखाद्याला एखादी भाषा येत नाही म्हणून त्रास देणं किंवा त्याला धमकावणं हा गुन्हा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, गरीब व्यापारी, कष्टकरी व कामगार राहतात. त्यांच्यावर होणारा अन्यात ताबडतोब थांबला पाहिजे. मी राज्य सरकारला आवाहन करतो की त्यांनी अशा घटनांवर कडक कारवाई करावी. समाजात एकता, आदर आणि समानता हीच खऱ्या मुंबईची ओळख आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषेवरून वातावरण तापलं

मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच पुण्यात गुजराती समुदायाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) व मनसे कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदेंवरही टीका होत आहे. दुसरीकडे उद्योजक सुशील केडिया यांनी “मराठी भाषा शिकणार नाही, काय करायचं असेल ते करा” अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमांवर करून वाद आणखी वाढवला आहे.