scorecardresearch

“भाजपाला आमची गरज नसेल, तर…”, महादेव जानकर यांचा इशारा

“आमच्या ताकदीवर सर्व जागी उमेदवार उभे करू. काही ठिकाणी जिंकू, तर…”

jankar bawankule
"भाजपाला आमची गरज नसेल, तर…", महादेव जानकर यांचा इशारा

विधानसभा निवडणुकीला जवळपास दीड वर्षाचा कालावधी आहे. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ( शिंदे गट ) ४८ जागा देऊ, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. त्यांच्या विधानानंतर शिंदे गटातून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनीही भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, असं जानकर यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले, “आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात माझे दोन आमदार आहेत. ९८ जिल्हापरिषद सदस्य, ३ सभापती, आसाम आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १ जिल्हापरिषद सदस्य, गुजरातमध्ये २८ नगरसेवक आहेत. चार राज्यात तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भाजपाला आमची गरज वाटत नसेल, तर आम्ही स्वतंत्र लढणार.”

हेही वाचा : “नरेंद्र मोदी श्वास घेतायत म्हणून जग चालतंय एवढंच…”, संजय राऊतांचा भाजपाला चिमटा; थेट अल्बर्ट आइनस्टाईनचा केला उल्लेख!

“आम्हाला घेण्याची भाजपाची इच्छा नाही. तर, आम्ही कशाला त्यांच्यामागे लागायचं आणि त्यांनी नाही म्हणायचं. आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे,” असं जानकर यांनी सांगितलं.

“राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला बरोबर घेतील. नसेल तर आमचा रस्ता वेगळा आहे. भाजपाकडे आम्ही पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तेथील जागाच मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचं ठरवलं असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत,” असं महादेव जानकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “महाराष्ट्र सरकारला कधीपासून चुंबनाचं वावडं झालं?”, संजय राऊतांचा खोचक सवाल; म्हणाले, “यांचा लव्ह जिहाद…!”

“आमच्या ताकदीवर सर्व जागी उमेदवार उभे करू. काही ठिकाणी जिंकू, तर काही ठिकाणी पराभूत करण्याच्या भूमिकेत जाऊ,” असेही महादेव जानकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 10:31 IST