परभणी, लातूर जिल्ह्यत वरुणराजाचे आशादायी पुनरागमन

परभणी/लातूर : तब्बल दहा ते बारा दिवसाच्या खंडानंतर बहुतांश ठिकाणी रविवारी रात्री व सोमवारी पावसाने हजेरी लावली. सोमवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार असून अनेक भागातले दुबार पेरणीचे संकटही टळणार आहे. गेल्या दोन दिवसात आभाळाचा रंग बदलल्याने चिंतेचे वातावरण  निवळू लागले आहे. रविवारी लातूर जिल्ह्य़ातील उदगीर, निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यातील काही मंडळात पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसाने अजूनही पेरते व्हाचा संदेश दिलेला नाही.

परभणी जिल्ह्यत गेल्या दोन दिवसात पावसाला प्रारंभ झाला आहे. तब्बल एक आठवडयापेक्षाही जास्त काळ पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसात कुठेना कुठे पाऊस पडत आहे.

जिल्ह्यत एक तृतीयांश एवढय़ाच क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे. पावसाअभावी कापूस व सोयाबीन तसेच मूग, उडीद आदी खरिपातील प्रमुख पिकांची पेरणी रखडली होती. गेल्या दोन दिवसात अनेक भागात पेरणीयोग्य ओल निर्माण करणारा पाऊस झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

परभणी जिल्ह्य़ातल्या जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर वातावरण ढगाळ होते, तर सोमवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यतल्या काही भागात झालेल्या पावसाने रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांची पेरणी वेळेवर झाली असली तरी त्या पिकांना मागील पंधरा दिवसांपासून पावसाची नितांत गरज होती. पूर्णा तालुक्यातील कावलगाव, चुडावा, एरंडेश्वर, कातनेश्वर, आहेरवाडी, पांगरा ढोणे, धनगर टाकळी तालुक्यात सर्वच गावांमध्ये जोरदार पाऊस बरसला. तालुक्यातील कावलगाव, चुडावा या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस खरिपाच्या पिकासह ऊस, हळद, केळी या पिकांसाठी लाभदायक ठरला.

लातूरच्या निलंगा तालुक्यातील भूतमुगळी मंडळात अतिवृष्टी होत रविवारी तब्बल ८३.८ मि.मी., तर कासार बालकुंदा मंडळात ३१.३ मि.मी. पाऊस झाला आहे. उदगीर तालुक्यातील नळगीर मंडळात ४४.३, देवणीतील वलांडी मंडळात ४३.३, अहमदपूरमधील खंडाळी मंडळात ४२.८ तर चाकूरमधील नळेगाव मंडळात ३८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

उदगीर तालुक्यात सर्वाधिक २५९.४ मि.मी. तर शिरूर अनंतपाळमध्ये सर्वात कमी १०९.४ मि.मी. असा पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ात आजवर सुमारे ४५ टक्क्य़ांच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी १७८.७ मि.मी. पाऊस झाला असून तो आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या १४१.४ टक्के इतका आहे.

सोमवारीही हलक्या सरी

सोमवारी दुपारी दोननंतर लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, चाकूर भागात पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत अधूनमधून या सरी बरसत होत्या.  पावसाचा जोर नसला तरी पाऊस टिकून असल्याने समाधानाची स्थिती निर्माण झाली आहे.

फाल्गुनी नदीला पूर

सोनपेठ तालुक्यात फाल्गुनी नदीला पूर आल्याने सोमवारी काही तास शेळगाव ते थडी उक्कलगाव या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. परभणी जिल्ह्यत आतापर्यंत एकूण २३८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यात परभणी तालुक्यात १३.९, गंगाखेड-३०.२, पाथरी २४.९, जिंतूर २१.५, पुर्णा ३२.९, पालम ३८.२, सेलू १६.१, सोनपेठ २९.३ आणि मानवत तालुक्यात २७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाडय़ाच्या काही जिल्ह्यंमध्ये रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून पेरण्यांना आता वेग येणार आहे.