वसंत मुंडे

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजलगावच्या अशोक डक यांची नियुक्ती माजलगावमध्ये नव्या राजकीय सूत्राची मांडणी मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा अस्त्र उपसले होते. त्या राजकीय घटनेच्या पार्श्वभूमीवर डक यांना मुंबईच्या बाजार समितीवर केलेली नियुक्ती पर्यायी ताकद वाढविण्याचा भाग असल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जात आहे.

चार दशकांपूर्वी शरद पवार यांच्या पुलोदच्या प्रयोगात तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी साथ सोडल्यानंतर त्यांचा गोविंदराव डक यांच्या माध्यमातून पराभव केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती  होत आहे.

बीड जिल्ह्य़ातील माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी अशोक डक यांना संधी देऊन माजलगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवी मांडणी केल्याचे मानले जात आहे. १९७८ ला शरद पवार यांनी काँग्रेस फोडून जनता पक्षाच्या मदतीने पुलोद स्थापन करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि मुख्यमंत्री बनले. तेव्हा माजलगावचे काँग्रेसचे आमदार सुंदरराव सोळंके यांनी शरद पवारांना साथ देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र इंदिरा गांधी यांनी ८० मध्ये सरकार बरखास्त केल्यानंतर मध्यावधी निवडणुकी सुंदरराव सोळंके यांनी पवारांची साथ सोडत काँग्रेसबरोबरच जाणे पसंत केले. त्यावेळी माजलगाव मतदारसंघातून सुंदरराव सोळंके यांचेच सहकारी गोविंदराव डक यांना उमेदवारी देऊन पवारांनी सोळंके यांचा पराभव केला होता. गोपीनाथ मुंडे यांचा जिल्ह्य़ात प्रभाव वाढल्यानंतर सुंदरराव सोळंके यांचे राजकीय वारसदार प्रकाश सोळंके यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर दिवंगत गोविंदराव डक यांचा मुलगा अशोक डक राष्ट्रवादीत सक्रिय झाले.  डक यांनी नऊ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश सोळंके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर मतदारसंघात सोळंके-डक असे दोन गट सक्रिय झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांनी दोघांना एकत्र केल्यानंतर यावेळी राष्ट्रवादीचा विजय झाला. सहा महिन्यापूर्वी  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने प्रकाश सोळंके यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राजीनामा अस्त्र उपसले. पक्ष नेतृत्वाने नाराजी दूर केली. या पार्श्वभूमीवर अशोक डक यांना थेट मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती करून आगामी काळासाठी माजलगाव मतदारसंघात पर्याय सक्षम केला आहे.