सांगली : पाणी वापर कार्यक्षमता वाढ आणि सिंंचन क्षमता वाढीसाठी जत तालुक्यातील विविध प्रकल्पासाठी ९९ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
सावंत यांनी सांगितले, जलसंपदा विभागांतर्गत अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती करणे, आणि पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे निर्मित व वापरातील सिंचन क्षमतेतील तफावत दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे विभाग अंतर्गत जत तालुक्यातील एकूण ६ लघुपाटबंधारे तलाव, ५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारा व १ मध्यम प्रकल्पाच्या सिंचन सुधारणा प्रकल्पासाठी ९९ कोटी ६ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा – सांगली : होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
यामध्ये वाळेखिंडी, प्रतापपूर, डफळापूर, रेवनाळ, सोरडी आणि कोसारी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प, सिंगनहळी, करजगी, बोरगी, बालगाव, बेळोडगी येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि संख मध्यम प्रकल्प यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. लवकरच कामास सुरुवात करून येणार्या पुढील काळात सिंचनासाठी व पिण्यासाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न दूर केला जाईल.
हेही वाचा – तुळजाभवानी देवीस अकरा तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण
जत तालुका हा नेहमी अवर्षणग्रस्त दुष्काळ असल्याने येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना लागणार्या पाण्याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून हा निधी मंजूर करण्यात यश आल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले.