सांगली : सांगली शहरातील आदित्य हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह १७ आंदोलक कार्यकर्त्यांना येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी बुधवारी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचा ‘आयएमए’च्या सांगली व मिरज शाखेने तीव्र निषेध केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शासकीय व कामगार योजनेतील लाभार्थींकडून रुग्णालय प्रशासन अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करीत शंकर माने यांच्यासह १७ आंदोलक कार्यकर्त्यांनी आदित्य हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात घुसून मंगळवारी नासधूस करत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार डॉ. सुनील माने यांनी पोलीस ठाण्यात काल रात्री दाखल केली. या तोडफोडीत संबंधित रुग्णालयाचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी डॉ. सुनील माने यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व आंदोलक कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा ‘आयएमए’च्या सांगली व मिरज शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कोणतेही रुग्णालय हे एक रुग्णसेवेचे पवित्र ठिकाण असते. मात्र, तिथे अहोरात्र रुग्ण सेवेत असणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी अथवा रुग्णालय मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला व तोडफोड करणे हे अमानवी व असंवेदनशील कृत्य आहे. अशा घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्यात भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण होते. जर का डॉक्टर व कर्मचारी किंवा रुग्णालये सुरक्षित राहिली नाहीत, तर सर्वसामान्य समाजाच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करीत सर्व संबंधित दोषी आंदोलक कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सांगली व मिरज शाखेने एका पत्रकाद्वारे केली आहे.