सांगली : अमली पदार्थांना आळा घालण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस विभागातील तब्बल १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी रक्कम रुपये २५ हजारांचे म्हणजेच एकूण चार लाख रुपयांचे बक्षीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत:च्या संवेदना संस्थेच्या निधीतून सोमवारी वितरीत केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते.
विटा येथे जानेवारी महिन्यात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर विषयाचे गांभीर्य ओळखून, तातडीने पावले उचलत अमली पदार्थ तस्करी विरोधी धडक कृती दलाची स्थापना करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एवढ्यावरच न थांबता दर आठवड्याला त्यांनी या विषयाचा सर्वोच्च प्राधान्याने आढावा घेतला. अमली पदार्थ विरोधी धडक कृती दलाच्या वेळोवेळीच्या कारवाया, प्रबोधन व अन्य माध्यमातून केलेल्या कार्यवाहीमुळे जिल्ह्यात अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांत घट झाली.
पालकमंत्री पाटील यांनी बक्षिसे दिलेल्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, अरूण पाटील, सचिन धोत्रे, विनायक सुतार, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, नानासाहेब चंदनशिवे, पोलीस शिपाई जावेद शेख आणि मोहसिन टीनमेकर तसेच विटा पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, महेश संकपाळ यांच्या पती/पत्नीच्या नावाचे धनादेश संबंधितास व अनुपस्थित कर्मचाऱ्याचे धनादेश पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.