सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीसाठी दुबार मोजणीला याल तर जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनादिवशी शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा बुधगाव (ता. मिरज) येथे पार पडला. यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, महेश खराडे, उमेश देशमुख आदींसह शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेे उपस्थित होते.यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, राज्यभरात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीचा प्रथम प्रयत्न फसला आहे त्यामुळे दुबार मोजणीसाठी नोटीसा दिल्या जात आहेत. मात्र एकदा शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर वारंवार मोजणीचे नाटक कशासाठी सुरू आहे? त्यामुळे दुबार मोजणीचा प्रयत्न केल्यास सांगलीसह बारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांना टाळे ठोकू.
शेतकरी संघटन मजबूत करण्यासाठी लवकरच बाधित बारा जिल्ह्यांत पवनार ते पत्रा देवी अशी यात्रा काढण्यात येईल. अदानीने गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख एकर जंगल खरेदी केले आहे. त्या जंगलातील खनिज गोव्यातील अदानीच्या खासगी बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास असल्याचा आरोप त्यांनी केला.
शक्तिपीठ करायचाच असेल तर महायुतीच्या आमदारांनी प्रथम राजीनामे द्यावेत आणि मग निवडून येऊन दाखवावे असे आव्हान खा. विशाल पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत निवडून आले मग पुन्हा शक्तिपीठ भूत बाहेर काढले. शक्तिपीठ महामार्ग करायचाच असेल तर अगोदर राजीनामे द्या मग शक्तिपीठ करा, असे खुले आव्हान त्यांनी दिले. सुरुवातीला अनेक लोकप्रतिनिधी शक्तिपीठ विरोधात होते, मात्र बरेच जण आता बाजूला गेले यामागील कारण मात्र समजत नाही असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बच्चू कडू आणि अजित नवले यांनी आपली भूमिका विषद केली. या चौघांनीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात या पुढच्या काळात आम्ही रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही दिली. प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले.