केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभांना संबोधित करताना काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) घराणेशाहीचे आरोप केले. अमित शाह म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यांच्या घराणेशाहीला मतदारांनी कौल देऊ नये.” दरम्यान, शाह यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील उपरगा येथील सभेतून उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले, होय, मला आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे. तत्पूर्वी जनतेने आदित्यची निवड करायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, आम्हाला आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर आम्ही अमित शाहांना विचारायला जाणार नाही. अमित शाह यांनी त्यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री नेमला आहे. तो मुख्यमंत्री शाहांच्या गोठ्यातल्या बैलासारखा वागतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका लाचार आणि गुलाम झालेला मी यापूर्वी कधी पाहिला नव्हता. उद्धव ठाकरे हे स्वाभिमानी रक्त आहे. आम्ही सर्व शिवसैनिक त्या स्वाभिमानी बाण्याने वागतो. त्या गुजरातच्या व्यापारी मंडळाला वाटत असेल की ते आम्हालाही विकत घेतील. महाराष्ट्र विकत घेतील आणि सर्वांना गुलाम करतील. परंतु, ते शक्य नाही.

संजय राऊत म्हणाले, ते गुजराती व्यापारी महाराष्ट्राला गुलामगिरीच्या बेड्या ठोकण्याची योजना आखत आहेत. परंतु, आम्ही त्याविरोधात लढतोय. महात्मा गांधींनीदेखील कधी गुजरातवर विश्वास ठेवला नाही. भाजपाची झुंडच्या झुंड मातोश्रीच्या पायऱ्या चढताना आम्ही पाहिलं आहे. अमित शाह त्यामध्ये सर्वात पुढे होते. तर फडणवीस आणि इतर लोक त्यांच्या मागे होते. मी स्वतः तिथे उपस्थित होतो, आमचे सगळे सहकारी होते. त्या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की अमित शाह मान हलवतायत आणि मान्यता देतायत. जागाचं समसमान वाटप, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद याला मान्यता देतायत. परंतु, भाजपावाले आता जे काही बोलतायत ते खोटं आहे. त्यांचा हा खोटारडेपणा एक दिवस त्यांना बुडवणार आहे.

हे ही वाचा >> रामदास कदम भाजपाला म्हणाले, “केसाने गळा कापू नका”, दुसऱ्या दिवशी सरकारकडून मुलाला मोठं पद बहाल! नियम मोडल्याची चर्चा

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, इतरांवर घराणेशाहीचे आरोप करणारे अमित शाह स्वतः काय करतात. राऊत उपरोधिकपणे म्हणाले, शाह यांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलंय… त्याने १०० शतकं ठोकली आहेत, म्हणून त्याला बीसीसीआयचे सचिव म्हणून नेमलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says we wont take amit shah advice to make aditya thackeray as maharashtra cm asc
First published on: 08-03-2024 at 12:29 IST