Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. विरोधकांच्या या टीकेविरधात प्रत्युत्तर देताना संजय शिरसाटांनी आज विरोधकांनाच आव्हान केलं. या लिलाव प्रक्रियेतून मी माझ्या मुलाला बाहेर पडण्यास सांगतो, पण तुम्ही हे हॉटेल खरेदी करून दाखवा, मग मी तुमच्या स्वागताला येतो, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट पत्रकार परिषदेत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबतीत काही बातम्या पसरवल्या जात आहेत. आमच्या संभाजीनगरमध्ये एक हॉटेल असून त्या हॉटेलचया लिलावात माझ्या मुलाने सहभाग दर्शवला आहे. त्यामुळे खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं जात होतं. या हॉटेलचं सातवेळा लिलाव झाला आहे, पण त्यात त्याने सहभाग घेतला नव्हता. पण आठव्यावेळी त्याने लिलावात सहभाग नोंदवला.
लिलाव प्रक्रियेतून मुलाला बाहेर पडण्यास सांगणार
“लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानतंर कोर्टात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ६७ कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे. पण पुढे प्रक्रिया काहीही झालेली नाही. जो व्यवहार पूर्ण झालेला नाही, त्यावरून टीका सुरू झाली. माझ्यावर जे आरोप झालेत त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे”, असंही संजय शिरसाट म्हणाले.
“पण माझं विरोधकांना आव्हान आहे की त्यांनी आता या लिलावात सहभाग घेऊन हॉटेल विकत घेऊन दाखवावं. तुम्ही हॉटेल खरेदी केलंत तर तुमच्या स्वागताला येईन. असे आरोप करण्यापूर्वी दहावेळी विचार करत जा”, असं संजय शिरसाट म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी संजय शिरसाट आहे, कोणाच्या घराला आग लावायला कमी करणार नाही. मी चक्रम आहे. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टीकोनातून आरोप करा, मी त्याला उत्तर देईन. पण मुलाबाळांवरून चर्चा केल्यावर मी चोख उत्तर देईन.”