सातारा : साताऱ्यात आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे बुधवारी पुणे येथे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली. साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह यंदा वयाची शंभरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी साकारले आहे. या बोधचिन्हाचा अनावरण समारंभ बुधवारी (दि. १०) आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील ‘मसाप’च्या माधवराव पटवर्धन सभागृहात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता शि. द. फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण होणार आहे.
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असतील. महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांची सन्माननीय उपस्थिती असेल, अशी माहिती कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली. साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी वसंत जोशी, जे. पी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसंत जोशी हे साताऱ्यातील सुप्रसिद्ध हॉटेल चंद्रविलास या उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. श्री. जोशी यांना सामाजिक कार्याची विशेष आवड असून, ते सातारा शहरात विविध सामाजिक कार्यांमध्ये हिरिरीने पुढाकार घेत असतात. तर जनार्दन शिंदे सहकार खात्यातील अतिशय कर्तबगार अधिकारी असून, ते जे.पी. या नावाने परिचित आहेत. श्री. शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील बऱ्याच सहकारी संस्था विशेषत: बँका व पतसंस्था या अडचणीत असताना त्यांना सहकार खात्याच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करून बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य केलेले आहे. स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही निवड केल्याची माहिती ही कुलकर्णी यांनी दिली.