सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा घरफोडीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्याने अशा घटना घडत आहेत का, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तपास करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पिंगुळी काळे पाणी येथे १.१६ लाखांची चोरी

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी काळे पाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घरातून काल (शुक्रवारी) रात्री १ लाख १६ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. तानावडे कुटुंबीय एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील ४० हजार रुपये रोख, २४ हजार रुपयांची सोन्याची चेन, २४ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, १८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि १० हजार रुपयांचे चांदीचे ताट व वाटी असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

आज (शनिवारी) सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसल्याने त्यांनी तानावडे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी खात्री केली असता कपाट तोडलेले दिसले. त्यानंतर तानावडे कुटुंबीयांना माहिती देऊन तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

कुडाळ नाबरवाडी येथील घटनेनंतर दुसरी घरफोडी

कुडाळ येथील नाबरवाडी येथे रुद्रे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचे प्रकरण ताजे असतानाच, पिंगुळी काळे पाणी येथे ही दुसरी घरफोडी झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपविभागीय अधिकारी आढाव, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे सिंधुदुर्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.