scorecardresearch

प्रकाश सुर्वेंकडून ठोकशाहीची भाषा, संतोष बांगरांकडून मारहाण, समर्थन करत शंभुराज देसाई म्हणाले…

शंभुराज देसाई यांनी प्रकाश सुर्वेंकडून ठोकशाहीची भाषा आणि संतोष बांगरांच्या मारहाणीचं अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे.

प्रकाश सुर्वेंकडून ठोकशाहीची भाषा, संतोष बांगरांकडून मारहाण, समर्थन करत शंभुराज देसाई म्हणाले…
एकनाथ शिंदे, संतोष बांगर, शंभुराजे देसाई…

शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील काही आमदार सध्या वादात सापडले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांनी ठोकशाहीची भाषा केली, तर आमदार संतोष बांगर यांनी थेट मारहाणच केली. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर देसाई यांनी सुर्वे आणि बांगर यांचं समर्थन केलं आहे. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शंभुराजे देसाई म्हणाले, “आमदार प्रकाश सुर्वे यांची क्लिप मी रात्री टीव्हीवर पाहिली. तो प्रतिक्रियेचा भाग असू शकतो. कारण ते स्वतः असं आक्रमकपणे बोलतील असं मला वाटत नाही. मात्र, या वक्तव्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांवर, सहकाऱ्यांवर, पदाधिकाऱ्यांवर कुणी दमदाटी केली असेल, दादागिरी केली असेल, मारहाण करण्याचा प्रयत्न केला असेल तर या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी असं सांगितलं असावं असं मला वाटतं.”

“मला त्याची पूर्ण माहिती नाही. संबंधित यंत्रणेकडून मी सविस्तर माहिती घेतो आणि याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा करू,” असं शंभुराजे देसाई यांनी सांगितलं.

आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीवर बोलताना देसाई म्हणाले, “संतोष बांगर यांनी केलेली मारहाण अनावधानाने झाली असेल. कँटिनने कामगारांना सकाळी काय द्यावं, संध्याकाळी काय द्यावं हे शासनाने ठरवून दिलं होतं. आमदार संतोष बांगर तेथे गेले आणि कामगारांना मिळणारं जेवण पाहिलं. तेव्हा कँटिननला निश्चित करून दिलेल्या जेवणाप्रमाणे जेवण नसल्याचं लक्षात आलं. म्हणून कदाचित ते चिडले असतील. परंतु ठेकेदाराने नियमांचं पालन केलं नाही म्हणून ते तसं वागले असतील.”

हेही वाचा :

“असं असलं तरी हात उगारणं योग्य नाही. त्यांनी त्यांना समजून सांगायला हवं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करायला पाहिजे होती. मात्र, रागाच्या भरात हे घडलं असेल,” असंही देसाई यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या