हिंगोली : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली आणि सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये ‘साड्या वाटपावरून राजकीय चुरस रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून ‘भाऊबीज’च्या निमित्ताने महिलांना मोठ्या प्रमाणावर साड्यांचे वाटप सुरू केले . तर या वाटपाचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने साड्यांची होळी केली. यामुळे हिंगोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीतील उद्धव शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे एकत्रितपणे उमेदवारीच्या चर्चेत व्यस्त आहेत. या राजकीय हालचाली दरम्यान ‘भाऊबीज सणाच्या नांवाखाली साड्या वाटप सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी मागील सहा महिन्यांपासून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध भागात महिलांना साड्या वाटपाचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, या वाटपाला उद्धव ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे काही दिवसांपूर्वी साड्यांची होळी करण्यात आली.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात मंगळवारी उद्धव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा साड्यांची होळी केली. या वेळी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मारोतराव खांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धव गायकवाड,परमेश्वर मांडगे आणि अमोल काले आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

या उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन साड्या वाटपाच्या कार्यक्रमाची चौकशी करून त्यास तत्काळ निर्बंध घालावेत, अन्यथा १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला.