राहाता : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून जमा केलेले कोट्यवधी रुपये ग्रो मोअर कंपनीचा संचालक भूपेंद्र राजाराम सावळे व त्याच्या साथीदारांनी शेअर बाजारात वापरणार असल्याचा करारनामा करून दिला होता. मात्र ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान, सावळेला शिर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्याला येथील न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ग्रो मोअर कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राहाता व शिर्डी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, त्यांचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. प्रारंभी सावळेला राहाता पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला शिर्डी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अनिल रामकृष्ण आहेर (रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आहेर व इतरांची १ कोटी ६५ लाख ४ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे मात्र, गुंतवणूकदारांचा जबाब नोंदवल्यानंतर फसवणुकीची रक्कम २ कोटी ५५ हजार झाली. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सावळेला १२राहाता येथील विशेष एमपीआयडी न्यायालयासमोर हजर केले.
सावळे व त्याच्या साथीदारांनी शेअर बाजारात रक्कम वापरणार असल्याचा करारनामा करून दिला होता. मात्र, ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याने त्या रकमेचा तपास करायचा आहे. ग्रो मोअर कंपनीच्या बँक खात्यातून सावळे यांच्या बँक खात्यात तब्बल ६५ कोटी रुपये जमा झाले. त्यांपैकी २३ कोटी रुपये परत करण्यात आले, मात्र उर्वरित ४२ कोटी रुपयांचा विनियोग कुठे केला, डिमॅट खात्यावरील व्यवहाराबाबत त्याच्याकडे चौकशी करणे आवश्यक आहे. ग्रो मोअर कंपनीच्या बँक खात्यातून इतर संस्थांना मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग झाल्या. ती रक्कम कोणाला व कोणत्या कारणासाठी दिली याचा तपास करून ती हस्तगत करण्यासाठी सहायक निरीक्षक आठरे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सावळेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शिर्डी संस्थान कर्मचाऱ्यांची गुंतवणूक
शिर्डी परिसरातून सुमारे ३५० कोटीची गुंतवणूक ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट’ कंपनीमध्ये करण्यात आली. अनेकांची पैसे दुप्पट मिळण्याच्या आमिषाने फसवणूक झाली. गुंतवणूकदारांत जवळपास ७० टक्के साईबाबा संस्थानमधील कर्मचारी आहेत. त्यांपैकी चार कर्मचाऱ्यांनी या कंपनीसाठी एजंट म्हणून केल्याचे उघडकीस आल्याने या ४ कर्मचाऱ्यांना साईबाबा संस्थानाच्या प्रशासनाने निलंबित केले.