नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला आहे. सानप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं.
मागील काही दिवसांपासून बाळासाहेब सानप भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. सानप भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरही शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या मनधरणीला यश आले नाही. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी आज (२१ डिसेंबर) भाजपा प्रवेश केला.
चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे,” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
https://t.co/RoN0Qeiblz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 21, 2020
एकत्र काम करणारी माणसं फार काळ लांब राहू शकत नाहीत. केवळ सत्ता नाही तर विचाराने एकत्र काम करणारी माणसं फार काळ लांब राहू शकत नाहीत. त्यामुळे बाळासाहेब सानप परत पक्षात आले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर “दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर थोडसं चुकल्यासारखं वाटतं. यावर चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी समजून घेत पक्षात पुन्हा प्रवेश दिला,” अशी भावना सानप यांनी व्यक्त केली.