नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. लोकसत्ताच्या व्यासपीठावरुन बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दावा केला आहे. यानंतर नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधी मोठं विधान केलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचे संकेत दिल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आदित्य ठाकरेंना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा एक वेगळा विषय आहे. स्थलांतरित करण्याचा विषय आहेच पण दुसरीकडे न्यायचा तिथे लोकांचा विरोध नसेल हे पहावं लागेल. लोकांना सोबत घेऊन, चर्चा करुन, स्थानिक भूमीपुत्रांना न्याय कसा मिळेल याचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल”.

नितेश राणेंच्या मतदारसंघात सभा घेत असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले; “मतदारसंघ कोणाचाही असला…”

हायवे, रस्ता किंवा कोणताही मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक लोकांना, भुमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. एकदा विश्वास बसला, मनातील शंका दूर झाल्यानंतरच आपण ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असंही ते म्हणाले.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धर्मेद्र प्रधान नेमकं काय म्हणाले –

संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहकार्याने कोकणच्या किनारपट्टीवर ६० लाख टन क्षमतेचा नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याला विरोध झाला. त्यात बहुमूल्य वेळ वाया गेला आहे. पण आता महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे सांगत धर्मेद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे लाखो कोटी रुपये पुढील काही वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत येतील. या प्रकल्पाशी निगडित पूरक उद्योग उभे राहतील आणि त्यातूनही मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. देशालाही पेट्रोकेमिकल क्षेत्रातील या मोठय़ा प्रकल्पामुळे ऊर्जा सुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल, असे धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.