‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत आपल्या गटातील आमदारांच्या बैठकीत केले होते. त्यांनी प्रथमच आपल्या पाठिशी भाजपा असल्याचे सूचित केल्याने या बंडामागे भाजपा असल्याच्या आरोपाला बळकटी मिळाली आहे. यानंतर शिवसेनेने भाजपासह बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. महाशक्ती उल्लेख करत सामना अग्रलेखातून भाजपाला टोला लगवण्यात आला आहे.

“महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. गुवाहाटीस्थित ‘रॅडिसन ब्लू’ योग शिबिरात महाराष्ट्रातील चाळिसेक आमदारांचे सखोल चिंतन शिबीर सुरू आहे. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ‘‘भारतीय जनता पक्ष एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.’’ आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण व कोठून आले, ते आता अखिल भारतास समजले. शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ‘‘भाजपा या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.’’ आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. भारतापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत. बरं, या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? काश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठ्या प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे. हिंदूंनी पलायन केले व जाताना भारतीय जनता पक्षाला शाप दिले,” असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

आपल्यामागे महाशक्ती! ; काही कमी पडणार नसल्याची शिंदे यांची बंडखोरांना ग्वाही

“स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार दिल्लीत असताना काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागते, हीच काय तुमची महाशक्ती? पाकिस्तानला खरेच धडा शिकविला असता तर काश्मीरच्या भूमीत हिंदू रक्ताचे पाट वाहताना दिसले नसते. ‘रॅडिसन ब्लू’ या योग शिबिराचे दरवाजे-खिडक्या बंद आहेत. मोकळी हवा येत नाही व शिबिरार्थी झापडबंद अवस्थेत पडले आहेत. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू-गांजा मिसळून दिला जात असावा आणि त्याच गुंगीत व धुंदीत ते बोलत व डोलत आहेत असे दिसते,” अशी टीका शिवसनेने केली आहे.

अग्रलेख : ‘महाशक्ती’चा मुखवटा

“भाजपा ही महाशक्ती वगैरे असल्याचे ज्यांना आता नव्याने उमजू लागले, त्यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येचा जाब गुवाहाटीच्या योग शिबिरातच विचारायला हवा, पण एका अर्थाने भाजपा म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले. भारतीय जनता पक्षाचा उल्लेख महाशक्ती असा केला ते खरेच आहे. काही जणांची ‘ईडी-पीडी’ त्यांनी दूर केली. तसेच काही जणांना ‘ईडी’ची पीडा होईल असे सांगून गुवाहाटीच्या योग शिबिरात जबरदस्तीने भरती केले. त्यामुळे तेथे नक्की कोणत्या प्रकारचे योग सुरू आहेत त्याची कल्पना यावी. श्री. मोदी आपले आदरणीय पंतप्रधान आहेत. योग प्रचारात त्यांचे मोठेच योगदान आहे. अनेकदा ते केदारनाथास जाऊन ध्यान व चिंतन करतात, पण गुवाहाटीचे ध्यान व चिंतन वेगळे आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजपा स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे व भाडोत्री लोकांना पकडून त्यांच्या तोंडून स्वतःच्या ‘महान’पणाचा गजर करून घेत आहेत,” असेही शिवसेनेने म्हटले आहे.

“भाजपाने पाकिस्तानला धडा शिकविला असे गुवाहाटीच्या योग शिबीरप्रमुखांना वाटत असेल तर मग हाच धडा त्यांच्या नव्या महाशक्तीने लडाखमध्ये घुसून आपली हजारो वर्ग किलोमीटर जमीन बळकावणाऱया चीनला का शिकवू नये? महाशक्तीला ते सहज शक्य आहे. महाशक्ती रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीचा आव आणते, पण आपल्याच देशात ज्या असंख्य प्रश्नांचा धुमाकूळ सुरू आहे, त्याबाबत सोयिस्कर मौन बाळगते. ‘अग्निवीर’ भरती प्रकरणात अनेक राज्यांत तरुणांनी तीव्र आंदोलने केली. त्यात महाशक्तीला मध्यस्थी करता आली नाही. महाराष्ट्र या काळात स्थिर व शांत राहिला तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वामुळेच, पण महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. त्यांनी द्वेषाचे अग्निकुंड पेटवले आहे. त्यात महाशक्तीच्या समिधा पडत आहेत. महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करण्याचे हे कारस्थान आहे,” असाही आरोप शिवसेनेने केला आहे.

Video: संघर्ष शिगेला! एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शिवसैनिकांनी फेकली शाई, अंडी

“जेथे हे योग शिबीर सुरू आहे, त्या आसाम राज्यात पुराने-प्रलयाने हाहाकार माजवला आहे. लोक हवालदिल आहेत, पण आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची सारी साधना ‘रॅडिसन ब्लू’ या योग शिबिरासाठी खर्ची घातली आहे. हे असे कोण तपस्वी आहेत की, त्यांना फलप्राप्ती व्हावी म्हणून ‘महाशक्ती’ने सर्व ताकद पणाला लावली आहे? पाकिस्तानच्या कुरापतींनी काश्मीरातील पंडित मरणयातना भोगत आहेत. त्यावर योग शिबिरात कुणाचे ‘ध्यान’ दिसत नाही. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढय़ाची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे,” अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.