देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयासमोर असून त्याबरोबरच आता निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून करण्यात आलेली याचिकाही सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर आणि राज्य सरकारवर टीकास्र सोडलं. एकनाथ शिंदेंना ही विनाशकाले विपरीत बुद्धी सुचल्याचं त्या म्हणाल्या. तसेच, यथावकाश लोक आपलं उत्तर निवडणुकांच्या माध्यमातून देतील, असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला.
“एकनाथरावांना ही विकृत बुद्धी सुचली हे…”
सुषमा अंधारे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. “भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती असते. आपलं खात असताना इतरांना आपल्यातला अर्धा भाग देणं ही संस्कृती आहे. पण आपलं खाऊन इतरांचंही हिसकावून घेणं ही विकृत बुद्धी आहे. ही विकृत बुद्धी ज्याप्रकारे एकनाथ शिंदेंना सुचत आहे, हे दुर्दैव आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“ते जितकं खालच्या पातळीचं राजकारण करतील…”
“विनाशकाले विपरीत बुद्धी आहे ही. ते जितकं न्यूनतम रसातळाचं राजकारण करतील, तितका या सगळ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनक्षोभ अधिकाधिक तीव्र होत जाईल. लोक बोलत नाहीत हा भाग वेगळा. पण यथावकाश जेव्हा कधी निवडणुकांचा रणसंग्राम होईल, तेव्हा लोक आपलं उत्तर बॅलेट बॉक्समधून देतील. खात्री आहे”, असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, एकीकडे राज्यातलं राजकारण तापू लागलेलं असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून सुनावणी होत आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या आपात्रतेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिकाही ठाकरे गटानं दाखल केली असून त्यावर एकत्र सुनावणी होण्याची शक्यता आहे.