नांदगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात सुट्टीवर आलेल्या चिंचविहीर येथील लष्करी जवानाचा मृत्यू झाला. दुसरा लष्करी जवान या अपघातात गंभीर जखमी झाला. गोपाळ दादा दाणेकर (३१) असे अपघातात मृत्यू झालेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याचा सहकारी नयनेश बापू घाडगे (३४) हा गंभीर जखमी आहे.

 हे दोघेही जवान बोलठाण येथील वीर जवान अमोल पाटील यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यानंतर ते गावी चिंचविहीरला गेले. सायंकाळी कामानिमित्त नांदगावकडे दुचाकीने येत असताना जळगाव खुर्द येथील विराज लॉन्ससमोर राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, दाणेकर यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला दुसरा लष्करी जवान घाडगे हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही जवान संक्रांतीला सुट्टीवर आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी सायंकाळी दाणेकर यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिंचविहीर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कमांडर कपाले, साहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी किरण देवरे, राजाभाऊ देशमुख, दर्शन आहेर, माजी सैनिक संघटनेचे दिनकर आहेर आदींनी पुष्पचक्र वाहत श्रद्धांजली अर्पण केली.  मृत दाणेकर यांच्यापश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भावजई असा परिवार आहे.