कराड: मुंबई बाजार समितीत चुकीचे काम झाल्याचे कारण पुढे करून जर कोणी दबावाचे राजकारण करीत असेल तर परिणामांना कधी घाबरलो नाही, खोट्या गुन्ह्यातून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास सत्य कधी मरत नसते असा कणखर बाणा दाखवत, विरोधकांनी (खासदार उदयनराजे भोसले) अशा प्रकारे रडीचा डाव खेळू नये अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन करुन प्रचारास सुरुवात

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधीस्थळी नतमस्तक होवून शशिकांत शिंदे यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ केला. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, सारंग पाटील, दीपक पवार, आदी नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ‘रामकृष्ण हरी, वाजली तुतारी’ ‘शरदचंद्र पवार, खासदार शशिकांत शिंदे यांचा विजय असो’ अशा कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा >>>सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही -शिवेंद्रसिंहराजे

खासदार उदयनराजेंच्या इशाऱ्यावरून टीका

मुंबई बाजार समितीत ज्यांनी चुकीचे काम केले ते कायद्यापेक्षा मोठे नसून, याचे आत्मपरीक्षण करूनच त्यांनी लोकांपुढे गेले पाहिजे असा सूचक इशारा खासदार उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचा नामोल्लेख टाळत केला होता. यासंदर्भात छेडले असता शिंदे म्हणाले, लोकसभेची संपूर्ण निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने कोणाचेही काहीही चालणार नाही आणि साताऱ्याच्या भूमीने कधीही जातीयरंग असलेल्या लोकांना थारा दिलेला नाही. आम्ही निष्ठा बदलली नाही आणि त्यातून होणाऱ्या  परिणामांनाही घाबरत नाही. खोट्या गुन्ह्यातून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास सत्य कधी मरत नसून, न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही. आम्ही लोकांच्या न्यायालयमध्ये असून, निवडणुकीत कोणी असा दबाव आणत असल्यास ते योग्य नाही. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी जर पाच टप्प्यात  निवडणूक होत असेलतर ‘महायुती’ला पोषक वातावरण नाही. राज्यकर्त्यांविरोधात सर्वत्र लाट असल्याची टीका शिंदे यांनी केली.

माझी लढाई तत्वाची

मी आव्हान कोणाला देत नाही. माझी लढाई कोणत्या उमेदवाराशी वा नावाशी नाही.  नेत्यांना, पक्षांना फोडून सातारा जिल्ह्या काबीज करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. पण, त्यास जनतेचा प्रतिसाद मिळला नसल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट

शरद पवार डाव टाकणारे कणखर नेते

शरद पवार हे पंतप्रधान झाले असते मात्र, ज्यावेळी काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेंव्हा एच. डी. देवेगौडांनी त्यांना बोलावलं होतं पण, पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता, शिंदे म्हणाले, पवारसाहेब कच खाणारे नव्हेतर डाव टाकणारे कणखर नेते आहेत. आताही त्यांनी महाराष्ट्राच्या अस्सल स्वाभिमानाचा डाव टाकला आहे त्यातून, ‘महायुती’चे स्वप्न भंग पावणार असून, निवडणूक निकालातून हे दिसून येईल असा विश्वास शिंदेंनी दिला.

माथाडी कामगार पाठीशी राहील

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील भाजपात असलेतरी माथाडी कामगारांची नेहमी शरद पवारांशी बांधिलकी राहिली आहे. माझेही त्यांच्यासाठी काम असल्याने माथाडी कामगार ‘महाविकास आघाडी’च्याच मागे उभा राहील असा ठाम विश्वास असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवंगत नेत्यांना अभिवादन

शशिकांत शिंदे यांनी सर्वप्रथम काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन पृथ्वीराज चव्हाणांचे पिताश्री, माजी केंद्रीय मंत्री डी. आर. तथा आनंदराव चव्हाण आणि काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रेमालकाकी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आमदार व माजी मंत्री बाळसाहेब पाटील यांच्यासह नेते मंडळींच्या उपस्थितीत शिंदेंनी ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या प्रतिमचे दर्शन घेवून अभिवादन केले. कराड शहरातील अनेक पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले.