महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप १६ ते १७ महिने बाकी आहेत. परंतु यासाठीची राजकीय मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेला (शिंदे गट) आगमी लोकसभा निवडणुकीत २२ आणि विधानसभेला १२६ जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतली. याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता, मुनगंटीवार म्हणाले की, “जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो.”

मुनगंटीवार म्हणाले की, “निवडणूक तर एक वर्षावर आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला हा माईकवरून, पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरून कधीच ठरत नाही. केंद्रात अमितभाई (गृहमंत्री अमित शाह), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी एकत्र बसतील. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही.”

हे ही वाचा >> सत्ताधारी पक्षांकडून बेजबाबदारपणाचे दर्शन ; विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग, विरोधकांचा हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मंत्रालयाचा सहावा मजला हे लक्ष्य असता कामा नये”

मुनगंटीवार म्हणाले की, कोणतंही राजकीय सूत्र हे तर्कसंगत ठरवावं लागतं. जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या जागा त्यांनी घेतल्याच पाहिजेत आणि भजापाने त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. तसंच भाजपालाही त्यांच्या जागा मिळायला पाहिजेत. आमचं सरकार हे प्रगती करणारं सरकार असलं पाहिजे. आमचं लक्ष्य मंत्रालयाचा सहावा मजला असता कामा नये. आमचं लक्ष्य हे भामरागडमधला शेवटचा आदिवासी बांधव असला पाहिजे. म्हणून जागावाटप हे काही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शंभर टक्के ठरणार नाही.