गेल्या काही दिवसांपासून ‘मुंबई मेट्रो ३’ हा प्रकल्प आरे कारशेडमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.आरे कॉलनीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्यात येणार आहेत. या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमारने मेट्रो ३चे समर्थन केले आहे. आता मराठमोळा अभिनेता सुमीत राघवनने देखील पाठिंबा दिला आहे.
नुकताच मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी विलेपार्ले येथे आयोजित झालेल्या एका कार्यक्रमात ‘मेट्रोची गरज व शाश्वत विकास’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यांचे हे व्याख्यान ऐकून प्रभावित झालेल्या सुमीत राघवनने मेट्रोचे समर्थन करत ट्विट केले आहे. ‘पावसाळ्यानंतर एक guided tour करता येईल का @MumbaiMetro3 ची? ह्या प्रकल्पाची भव्यता अनुभवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25/25 mtr मुंबईच्या पोटात उतरुन मुंबईकरांचं आयुष्य सुकर करणा-या कामगारांचे आभार मानायचे आहेत’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
पावसाळ्यानंतर एक guided tour करता येईल का @MumbaiMetro3 ची? ह्या प्रकल्पाची भव्यता अनुभवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25/25 mtr मुंबईच्या पोटात उतरुन मुंबईकरांचं आयुष्य सुकर करणा-या कामगारांचे आभार मानायचे आहेत. #JaiMaharashtra @AshwiniBhide https://t.co/hPXPOEyxug
— Sumeet (@sumrag) September 21, 2019
दरम्यान, एककीकडे बॉलिवूड अभिनेता मनोज वायपेयी, अभिनेत्री दिया मिर्झा, अभिनेत्री श्रद्धा कपूर, मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मेट्रो विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.