शरद पवार गटातील लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. खासदार सुळे यांनी हे पत्र एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केलं आहे. यासह सुळे यांनी म्हटलं आहे की, आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र पोलीस अधीक्षकांना (पुणे ग्रामीण) लिहिलं आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात लिहिलं आहे की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे आणि लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक त्यांना घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली आहे. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

रोहित आणि युगेंद्र पवारांचा आवाज दाबण्याची ही कृती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब आहे. सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे की, आपणाकडून (पोलीस अधीक्षक) रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरवण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास आहे.