मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतली. राज्यात यंदाच्या कृषी हंगामात चांगला पाऊस, वेळेवर मिळालेली खते-बियाणे यामुळे कृषी उत्पादनात चांगली वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. अन्नधान्य पिकाचे एकूण १६५.०२ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ३९ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये अन्नधान्य ८१.६० लाख टन, खरीप गळीतधान्य ५६.७१ लाख टन, कापूस ७१.२० लाख गाठी व ऊस ११३९.३३ लाख टन इतके उत्पादन झाले आहे. तर खरीप हंगाम २०२२ मधील लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर, सोयाबीन ४६ लाख हेक्टर, भातशेती १५.५० लाख हेक्टर, मका ९.५० लाख हेक्टर, कडधान्य २३ लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी १७.९५ लाख क्विंटल बियाणे आवश्यक असून महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व खासगी संस्थेकडे मिळून १९.८८ लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ४५.२० लाख मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध होणार असून त्यापैकी ९.०८ लाख मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात १६.९८ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळण्यासाठी तसेच बनावट बियाणांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ३९५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण आता शेतकऱ्यांना मोफत देणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ५ जूनला मोसमी पावसाचे आगमन

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा असून ५ जूनला तळकोकणात मान्सून दाखल होईल अशी माहिताी भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळकर यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिली. अंदमानमध्ये १६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले असून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे. केरळमध्ये २७ मे रोजी र्नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. मराठवाडय़ात सामान्यपेक्षा जास्त  पाऊस होईल, तसेच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पीक विम्यासाठी बीड प्रारूपाबाबत पाठपुरावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांसमोर पीक विम्याचा गंभीर प्रश्न असून सध्याची योजना समाधानकारक नाही. त्यामुळे राज्यात यशस्वी ठरलेल्या बीड प्रारूपाची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात आली असून याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. याबाबत लवकरच यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.