धारदार शस्त्रांनी परस्परांवर हल्ला

सांगली : पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे रविवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१वी जयंती साजरी करण्यासाठी दुधोंडीतील साठेनगर परिसरामध्ये काही तरुण जमले होते. या ठिकाणी मोहिते आणि साठे असे दोन गट आहेत. जयंतीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही गटातील तरुण एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. त्यांत अरिवद साठे, विकास मोहिते आणि सनी मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर पलूस ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी जाऊन तेथील परिस्थिीतीचा आढावा घेतला. हाणामारीत दोन्ही गटांनी धारदार शस्त्रांसह लाठय़ांनी परस्परांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार जयंती कार्यक्रम साजरा करण्यावरून झालेल्या वादातून घडला की अन्य काही कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.