धाराशिव : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिव शहरात रंगणार आहे. येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात जंगी कुस्त्यांचा फड पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी राज्यभरातून ९५० मल्ल व ५५० पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्लांचे शड्डू संकुलात घुमणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती तर अखेरच्या दिवशी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजक सुधीर पाटील यांनी दिली.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत साखरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आदी उपस्थित होते. सुधीर पाटील म्हणाले, की प्रामुख्याने कुस्तीपंढरी म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा परिसर ओळखला जातो. त्यातही कोल्हापूर तर या क्रीडा प्रकाराची राजधानी आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्हा एक असताना १९६९ मध्ये अशी स्पर्धा उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूरमध्ये झाली होती. त्यानंतर हे दोन्ही जिल्हे वेगळे झाले. धाराशिव शहरात अशी स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. कुस्तीगीर परिषदेने दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ करणार आहोत. सर्वपक्षीय तसेच अनेक क्रीडा प्रेमी, क्रीडा संस्थांच्या सहयोगाने नियोजन तडीस नेले जात आहे. शासकीय अधिकारीही त्यासाठी योगदान देत आहेत. गुरूवारी सर्व मल्ल दाखल होतील. तर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे. माती व गादी असे दोन्हींचे प्रत्येकी १० गट आहेत. जवळपास ५५ ते ६० स्पर्धा होणार आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत, क्रीडामंत्री संजय बनसोडे, जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

आणखी वाचा-“मनोज जरांगेंच्या मागून कोणीतरी…” मराठा-ओबीसी संघर्षावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदर शरद पवार, खासादर सुप्रिया सुळे, खासादर छत्रपती उदयनराजे, माजी खासादर संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, तुळजाभवानी देवीचे महंत यांसह विविध पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, ६५ हजार प्रेक्षकांची गॅलरी

धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात ही स्पर्धा होत असून ६५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आकारास आली आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी सोमवारी सायंकाळी चार वाजता अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेचा उत्साहपूर्ण थरार माता-भगिनींनाही अनुभवता यावा यासाठी एक स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आली आहे. साधारणपणे दोन हजार महिलांच्या आसनांची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली असल्याचेही सुधीर पाटील यांनी सांगितले.