सावंतवाडी : ​महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने उभारलेला महत्त्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ​धरणाच्या पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घन मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

​धरणाखालील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.​पाण्याच्या वाढलेल्या विसर्गामुळे तिलारी नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ​प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाऊ नये, तसेच जनावरांना नदीजवळ चरायला सोडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.