सातारा : सातारा पालिकेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर खासदार उदयनराजेंचे पदधिकारी आणि माझे पदाधिकारी असा सगळ्यांचा एकत्रित विचार करून एकत्रित लढवणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
भाजपाच्या नगरविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अविनाश कदम, अमोल मोहिते, भालचंद्र निकम, सुवर्णा पाटील, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब निकम, दत्ताजी थोरात, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सातारा भाजपामध्ये नवा जुना असा कोणताही वाद नाही. पक्ष संघटना म्हणून सगळेच एक आहोत. लोकसभेला, विधानसभेला तुम्ही आमच्यासाठी काम केलेत. आम्हाला निवडून दिलेत. आता तुमची निवडणूक आहे. तुमच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधींना काम करायचे असून, पळावे लागणार आहे, असे स्पष्ट करत शिवेंद्रसिंहराजे यांनी कुठलाही वादविवाद न करता ही निवडणूक लढवायची आहे. एकदिलाने काम करून निवडणुका जिंकायची आहे. प्रशासक अभिजित बापट यांचे त्यांनी कौतुक केले. पुढे कोणीही विरोधक असेल तरीही आपापसात कोणतेही वादविवाद, आकस न ठेवता ही निवडणूक जिंकायची आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकद लावली. त्यामुळे आपण लोकसभा घेतली. स्वातंत्र्यानंतरचा पहिला भाजपाचा खासदार ताकदीने आपण निवडून आणला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीचा गड होता तो भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही. तुमच्या सगळ्यांचे आहे. मतदारांनी उदयनराजेंना खासदार केले. देशात आणि राज्यात सरकार आपले आले.
देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार निवडणूक लढवायची आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बैठक कोणाच्या विरोधात कुरघोड्या करण्यासाठी घेतलेली नाही. आपल्याला सर्व जातीधर्माचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मग तो मराठा, ओबीसी किंवा मुस्लिम असू द्यात, सर्व समाजाचे प्रतिनिधी निवडून आणायचे आहेत. तरुणांना संधी मिळाली पाहिजे. समोर राष्ट्रवादीचे पॅनेल की शिवसेनेने पॅनेल असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
तिसरी आघाडी पण होण्याची शक्यता आहे. आपल्या या सर्व आव्हानांना तोंड द्यायचे आहे आणि लढायचे आहे. भले मी म्हणतो ताकद कमी की जास्त, हा विषय बाजूला ठेवून निवडणुकीत आपल्यासमोर आव्हान असणार आहे, त्यास तोंड द्यायचे आहे. अनेक इच्छुक उमेदवार आहेत.
पालिकेला अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे. आपल्याला त्याही आव्हानाला तोंड द्यायचे आहे. त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे सगळ्याच इच्छुकांना विनंती आहे. आपल्या प्रभागातील जेष्ठ मंडळी ज्यांना निवडणुकीत उभे रहायचे आहे, त्यांनी आपल्या प्रभागात नागरिकांना भेटा, तरुण पिढी किती पाठी आहे त्याचा अंदाज घ्या, असा सल्ला इच्छुकांना दिला. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री.
