Raosaheb Danve On Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या विस्तारात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे काहीजण नाराज झाल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. तसेच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे हे दोन्हीही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

छगन भुजबळ यांनी तर त्यांची नाराजी बोलून देखील दाखवली आहे. एवढंच नाही तर आता पुढे काय भूमिका घ्यायची हे आपण कार्यकर्त्य़ांशी बोलून ठरवणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, या घडामोडींवर आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत बोलताना दानवे यांनी म्हटलं की, पक्षाने त्यांच्यासाठी काही वेगळा विचार केला असेल. तसेच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही? याचं कारण फक्त अजित पवार हेच सांगू शकतील, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; विधीमंडळात १० ते १५ मिनिटांच्या चर्चेत काय घडले?

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीसंदर्भात बोलताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, “सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आता कदाचित पक्षाने त्यांचा वेगळा विचार केला असेल. त्यांच्यावर वेगळी मोठी जबाबदारी पक्ष देणार असेल, त्यासाठी कदाचित त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नसेल. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचा अर्थ त्यांचं पक्षातील स्थान कमी होईल असं नाही. ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तसेच ते नाराज असतील असं मला वाटत नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करताना जहां नहीं चैना, वहां नहीं रहना असं सूचक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आता यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, “ते कवी आहेत. अशा विषयांवर नाही तर त्यांनी अनेकवेळा कविता केलेल्या आहेत. आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? कशामुळे मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही? हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.