Uddhav Thackeray : ५० खोके देऊन भाषेचं आणि संस्काराचं धन विकत घेता येत नाही. सध्या जे काही सुरु आहे, राजकारणी म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा कुसुमाग्रजांची नाव घेण्याची पात्रता आहे का? सध्याच्या घडीला भाषा विचित्र होत चालली आहे. सध्या तर अनेकांना मराठी भाषेचा शब्दकोष हाती घेण्याची वेळ आली आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठी भाषा दिवसानिमित्त एक खास कार्यक्रम बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्या काहीही चांगलं चाललेलं नाही

सध्या काही चांगलं वाचायला, ऐकायला मिळत नाही. टीव्ही लावला की काही प्रतिक्रिया चांगल्या असतात. बाकी सगळ्याबाबत काय बोलायचं? बोलताना लोक चांगलं बोलून जातात. प्रत्यक्ष कृतीत मात्र भलतंच काहीतरी करतात. सत्तेसाठी जे काही चाललं आहे ते पाहून काय बोलावं? मूँह मे राम और बगलमें ईडी ही जी काय अवस्था आहे त्यात मी तर म्हणेन की ईडी यांची घरगडी झाली आहे. धाकदपटशा दाखवून सत्ता लुटायची आहे. चंदीगडचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला ते बरं झालं. आमचीही अपेक्षा आहे की सर्वोच्च न्यायालयाने या घटनाबाह्य सरकारची हवा काढून त्यांना रस्त्यावर आणावं अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

माझी लढाई महाराष्ट्रासाठी

आपला महाराष्ट्र आणि देश खालवत चालला आहे. एकट्या माझ्यासाठी ही लढाई नाही. मी महाराष्ट्रासाठी लढाईला उतरतो आहे. शिवसेना संपवण्याचा डाव म्हणजे हिंदूंची शक्ती आणि मराठी अस्मिता संपवण्याचा डाव आहे. असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आत्ता इथे काही लोक म्हणाले. मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून मी लढत नाहीये. मुंबई लुटली जाते आणि महाराष्ट्र ओरबाडला जात असेल तर मी काही त्यांच्या पालख्या वाहू का? मी त्यांच्याबरोबर गेलो असतो तर मलाही खोके मिळाले असते.

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्राचं वर्णन काय केलं काय? कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा.. आज त्या महाराष्ट्राची ओळख गद्दारांच्या देशा, लाचारांच्या देशा, गुंडांच्या देशा अशी झाली आहे. असं होत असेल तर आपण फक्त मराठी भाषा दिन साजरा करायचा का? ज्या राज्याची भाषा आहे ते राज्य वाचवणं आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लाचार होऊ शकत नाही, गद्दार होऊ शकत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.