वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने (मविआ) बोलावलेल्या बैठकांना उपस्थित न राहण्याचा आदेश दिलाय. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत पूर्णपणे समावेश झालेला नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेनंतर आगामी काळात प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिलीय. जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला हा तिढा कधी सुटेल याबाबतही त्यांनी नेमके विधान केलेय. ते नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. “आमची चर्चा झाली आहे. दोन दिवसांत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकरांशी बोलतील. फार तर ५ किंवा ६ मार्चपर्यंत हा तिढा पूर्णत: सुटलेला असेल असं मला वाटतं,” असं वडेट्टीवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय?
प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर नुकतेच एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांच्या याच भूमिकेवर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका असे सांगावे लागत नाही. आंबेडकरी जनतेची एक भूमिका आहे. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत जायला हवं, अशी भावना राज्यभरातील लोकांची आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“…तर हुकूमशाहीला सुरुवात होईल”
“बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत. लोक त्यांना प्रतिसाद देतायत. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी देशात परिवर्तन घडवून आणण्याचं ठरवलंय. हे परिवर्तन घडून न आल्यास देशात खऱ्या अर्थाने हुकूमशाहीला सुरुवात होईल. प्रकाश आंबेडकर यांचीदेखील हीच भूमिका आहे,” अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.