कराड : कोयना पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असून, काल ३० जूनला सायंकाळी उशिरा कोयना जलाशय निम्याने भरले. एक जून रोजी धरणाच्या जलवर्षास प्रारंभ होताना २२.४२ टीएमसी (अब्ज घनफूट) असलेला कोयनेचा पाणीसाठ्यात केवळ एका महिन्यात तब्बल ३३.६५ टीएमसीने वाढ होत आज तो ५४.४९ टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना धरणाच्या इतिहासात जूनमध्ये प्रथमच अर्धे भरले असल्याचे कोयना सिंचन विभागाने म्हटले आहे. गेल्यावर्षी ३० जून रोजी हाच जलसाठा केवळ १९.७९ टीएमसी होता.
सध्या कोयनेचा जलसाठा आजवरच्या सरासरीपेक्षा ३४.३७ टीएमसीने जादाचा आहे. पाण्याची मागणी व पाण्याचा वापर फारच कमी असल्याने हा भरघोस धरणसाठा आणि उर्वरित पावसाळ्याचा विचार करता पूरस्थिती टाळण्याचे धरण व्यवस्थापनासमोर आव्हान राहणार आहे.
कोयना धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. यंदाचे पावसाळी वर्ष सुरू होताना एक जून रोजी धरणात २२.४२ टीएमसी पाणी साठा होता. यामध्ये केवळ एका महिन्यात तब्बल ३३.६५ टीएमसीने (अब्ज घनफूट) वाढ होत आज तो ५४.४९ टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना धरणाच्या इतिहासात जूनमध्ये प्रथमच अर्धे भरले असल्याचे कोयना सिंचन विभागाने म्हटले आहे. गेल्यावर्षी ३० जून रोजी हाच जलसाठा केवळ १९.७९ टीएमसी होता.
मान्सूनपूर्व आणि मोसमी पावसाच्या जोरदार हजेरीने कोयनेचा धरणसाठा जून महिन्याच्या सरतेशेवटी निम्यावर भरले आहे. आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयनेच्या पाणलोटात ९८.३३ एकूण १,४६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या २९.३२ टक्के) पाऊस झाला आहे. त्यात कोयनानगराला १,५७५, नवजाला १,३५४ आणि महाबळेश्वरला १,४६९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कोयनानगराला ८४३, नवजाला १,०७२ आणि महाबळेश्वरला ८६३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.