Devendra Fadnavis on Uddhav Thackeray CM face: “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत जातो. तरीही आमच्या दिल्ली भेटीवर टीका केली जाते. उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली. पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही. आता तर शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही. त्यावर नाना पटोलेंनीही हीच री ओढली. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही”, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शरद पवारांच्या डोक्यातला चेहरा सागंणे कठीण

टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यावरून चाललेल्या वादावर खोचक टीका केली. शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे मला सांगता येईल. पण त्यांचा डोक्यात कुणाचा चेहरा आहे, हे सांगणे सर्वात कठीण आहे, अशीही कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे वाचा >> लाडकी बहीण योजनेचे श्रेय कुणाचे? ‘देवा भाऊ’ उर्फ देवेंद्र फडणवीस म्हणाले…

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार का?

काँग्रेसचा एक सर्व्हे लिक झाला त्यात शिवसेनेच्या उबाठा गटाला कमी जागा मिळतील, असे दाखविले गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असा सर्व्हे कधीही लिक होत नसतो. उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सदर सर्व्हे फोडला गेला, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीचा चेहरा कोण?

दरम्यान महायुतीमध्येही तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचा चेहरा पुढे करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. तसेच एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर असते तीच निवडणुकीत नेतृत्व करते. आमचा मुख्यमंत्री असताना दुसऱ्या चेहऱ्याचा विचार होत नाही. विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.