02 July 2020

News Flash

सय

किती घट्ट नातं आहे तुमचं.. माझ्या आठवणीतल्या आठवणीतही नाही आठवत तुम्ही कधी भांडल्याचं

घरात एकटीच राहिलेल्या माँच्या जगण्याचा आधार आहे तो आठवणींचा.. मुलीची आणि मुलाची आणि त्यांच्यातल्या नात्याची सय या आईला दिवस जगवायला मदत करतेय.. आईचं
हे स्वगत.. स्वत:साठीचं..

‘‘आज अंगात जरा कणकण आहे, डोकंही दुखतंय, तापही असावा बहुतेक.. अशा वेळी गप्प पडून राहवंसं वाटतं आणि गप्प बसून राहिलं, की तुमच्या आठवणी फेर धरतात.. लहानपणापासून माझा चेहरा पाहूनच कळायचं तुला. अगदी एवढीशी पाच वर्षांची असताना मला एकदा ताप आला होता..‘‘माँ, काय झालंय?’’
‘‘काही नाही गं..जरासं बरं नाही’’ असं म्हणायची फुरसद, तू आपल्या चिमुकल्या हातानं मला ओढत खोलीत घेऊन जायचीस.. उडी मारून पलंगावर चढून, उशा नीट करून मला बळेबळेच झोपायला लावायचीस.. आपले इवले इवले हात माझ्या कपाळावर टेकवत ताप आहे का पाहायचीस..‘आता झोप हं! मी सांगेपर्यंत नाही हलायचं’ असं धमकावत आपल्या गोंडस हातांनी थोपटत राहायचीस..मग कामाचा राक्षस वाकुल्या दाखवत असतानादेखील कधी तरी हळूच डोळा लागून जायचा. जाग आल्यावर तू जमिनीवर पसारा मांडून बसलेली असायचीस खेळण्यांचा. तुझ्या त्या मायेच्या स्पर्शानंच की काय र्अध दुखणं दूर पळून गेलेलं असायचं. आता तुला फोनही करायला वेळ नसतो. कधी आठवणींचा गुंता उलगडावा म्हणून फोन केलाच, तर..
‘‘माँ..बिझी आहे मी.. मीटिंगमध्ये आहे.. नंतर करीन फोन,’’ असं म्हणतेस आणि मग मीही घाईघाईने फोन ठेवते. त्या ‘नंतर’ची मी खूप वाट पाहते.. कुठल्या पदरात गाठ मारून ठेवतेस तो?..चार दिवसांनी तुला अचानक आठवण येते नि मग हाताला रग लागेस्तोवर उतू जाणारं तुझं बोलणं.. अधिकच व्याकूळ करून जातं मला..
परवा कपाट आवरताना.. आता कपाटही नीटनेटकंच लावलेलं असतं गं. अगदी व्यवस्थित. एकमेकांवर रचलेल्या घडय़ा. कारण ते उचकटणारंच नसतं कोणी.. कधी कधी काही तरी शोधताना तू कसं उचकटून टाकायचीस सगळं.. नि मग दार उघडलं की, अंगावर कोसळणारे कपडे बोळे करून कोंबायचीस मग मी खूप ओरडायचे तुला.. आता फार त्रास होतो गं ते सारं आठवल्यावर.. तुझ्याकडे आले तेव्हा पाहिलं मी, कसं लख्ख ठेवलं आहेस घर सारं! डोळे झाकून वस्तू शोधावी.. हं, तर कपाट लावायला घेतलं.. उगाचंच. कारण स्वयंपाक करण्याशिवाय काही कामच नसतं.. ढीगभर न संपणारा वेळ नि भरलेल्या पोटावर वेळ झाला म्हणून रिचवलेले घास.. तर कपाटावरची ती तुझ्या अक्षरातली लिहिलेली वाक्यं वाचली, बारावीत भैयाला कमी मार्क पडले तेव्हा तू लिहून त्याच्या टेबलावर चिकटवलेली.

Life is like a ball…
The deeper we fall, higher we bounce
So when we feel we are at the lowest,
remember!
We are about to bounce higher than before!

काय काय उपद्व्याप केलेस तू!.. खूप निराश झाला होता तो त्या वेळी.. पण तू सतत सावलीसारखी उभी राहिलीस त्याच्यासोबत.. वेगवेगळ्या गोष्टी सांगून हिंमत वाढवायचीस त्याची. रात्री त्याच्याच बरोबर, त्याच्याच खोलीत झोपू या, असा आग्रह करायचीस. हे वाक्यं वाचून दाखवताना किती रडली होतीस तू! वाचताही येईना तुला ती वाक्य. कुठे बाहेर गेलीस की त्याला फोन करत राहायचीस नि आम्हालाही त्याच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगायचीस. आता बोलता का गं तुम्ही एकमेकांबरोबर? की कामाच्या धबडग्यात तुला वेळ मिळत नाही नि निवांत वेळेत त्याचं काम तिथे अमेरिकेत जोरात चालू असतं.
तोही किती प्रेम करायचा तुझ्यावर! अगदी तू जन्माला यायच्याही आधी! रोज मला प्रश्न करायचा, ‘‘माँ, छोटुली येणार तरी कधी गं आपल्या घरी?’’ त्याची ती आतुरता कळल्यासारखी तू पोटातून ढुशी मारायचीस. तुला हातांनी चाचपून पाहताना अगदी चेहराभर आनंद पसरायचा त्याच्या. काल परवापर्यंत तू घरात बागडत होतीस. अगदी आनंदाचे माणिक मोती उधळत. कुतूहलाचं केवढं आभाळ भरलेलं असायचं तुझ्या डोळ्यात.. तो आपल्या बुद्धीला सुचेल तशी उत्तरं देऊन तुझं समाधान करायचा, अगदीच कठीण प्रश्नाचं उत्तर मग आमच्याकडे शोधायचा, पण तुझी जिज्ञासा शमवायचा.

किती घट्ट नातं आहे तुमचं.. माझ्या आठवणीतल्या आठवणीतही नाही आठवत तुम्ही कधी भांडल्याचं. आजूबाजूचे लोक कौतुक करायचे तुमच्या प्रेमाचं.. मोठं होता होता हे तुमचं नातं किती अलवारपणे एकमेकांत उलगडत होतं. संध्याकाळी तुला यायला जरा उशीर झाला की तो कसा कासावीस व्हायचा.. तुझ्या मागे एक मुलगा लागला आहे हे तुझ्या मैत्रिणीकडून कळताच त्याला चांगली समज देऊन आला तो.. परवा परवाच तुम्ही हा विषय काढला होता. तू म्हणाली होतीस, ‘‘भैया, अजूनही तो बसमध्ये दिसला की मागच्या दारातनं हळूच उतरून पसार होतो.’’ नि किती हसलो होतो आपण.. नेहमी बरोबर असूनही एकमेकांबरोबरचं बोलून संपायचं नाही तुमचं.. जेवण गार होऊन जायचं..
आणखी एक गोष्ट आठवली, बाबांनी, नातेवाइकांनी दिलेले पैसे कसे जपून ठेवले होते त्यानं. रोज नोटा मोजायचा.. जत्रा झाल्या, पिकनिक झाल्या, टूर झाल्या पण कधीच हात लावला नाही त्या पैशांना.. पण तुझं घडय़ाळ हरवलं नि तू रडून गोंधळ घातलास, त्याच संध्याकाळी तो बाहेर गेला नि सगळे पैसे खर्च करून एक छानसं घडय़ाळ घेऊन आला.. दोघंही किती रडला होतात त्या दिवशी नि आम्हालाही रडवलंत.
अजूनही कधी मधी त्याचं कपाट उघडून त्यातल्या त्या मखमली पेटीत तू बांधलेल्या राख्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या पाहते मी.. त्यावरून हात फिरवताना तुमच्या भाऊबीजेच्या, रक्षाबंधनाच्या आठवणी जाग्या होतात.. तू हट्टाने केलेला, जळून गेलेला पहिला केक आठवला, आणि तो ‘एवढा काही वाईट नाही, उलट जळालेल्या केकला एक वेगळीच छान टेस्ट असते,’ असं म्हणून त्याने खाल्लेलाही आठवतो.
कसं असतं ना माणसाचं मन? मनुष्य नेहमी भूतकाळात रमतो, जपून ठेवलेल्या आठवणींची उजळणी करून आनंदित होतो.. पण जेव्हा या आठवणी घडत असतात तेव्हा या गोष्टी इतक्या महत्त्वपूर्ण असतील याची यत्किंचितही जाणीव नसते त्याला.. त्या घडून गेल्यावर, त्यांच्या आठवणीत रूपांतर झाल्यावर आपण त्यांना गोंजारत बसतो..

तुमच्या आठवणींनी जीव घुसमटल्यासारखा झाला म्हणून भैयाच्या खोलीची खिडकी उघडली. कुरकुर करतच खिडकी उघडली आणि बागेतलं पेरूचं झाड दचकल्यासारखं झालं. वनमहोत्सवाला बाईंनी भेट दिलं म्हणून नाचत तू ते आणलं होतस. शाळेचा युनिफॉर्मही न काढता तुम्ही ते लावलंत.. वाढल्यावर त्याला लागलेला पहिला पेरू वाटून खाताना किती चमकत होते तुमचे डोळे!.. नंतर लागणाऱ्या प्रत्येक पेरूवर तुमची नजर असायची.. आता पेरूचं झाड आडवं तिडवं वाढलंय.. खच्चून पेरू लागतात त्याला. हे एवढे ढीगभर पेरू पक्ष्यांनी खाऊन खाली टाकलेले दिसतात रोज.. पण त्या पहिल्या वाहिल्या पेरूची मजाच वेगळी होती. हो ना? एकदा भैया पेरूच्या झाडावरून पडला, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा तू रडून केलेला तो आकांत! बापरे! डॉक्टरांनाही कळेना की पाय तुझा मोडला की त्याचा! नि एकदा आजीच्या रंगीत गोळ्या तू जेम्स म्हणून खाल्ल्या तेव्हा? भैयाचा आरडाओरडा पाहून आम्हाला वाटले की त्यानंच गोळ्या खाल्ल्या की काय? आता प्रॉब्लेम असेल तर करतो का गं तो तुला फोन? कारण तुझा सल्लाच त्याला वेळोवेळी उपयोगी पडायचा नि त्याचे उपदेश तुला..

हल्लीच फोन आला होता त्याचा.. मी विणून दिलेला स्वेटर ट्रॅममध्ये विसरला म्हणे.. खूप हळवा झाला होता वेडा!. खूप जीव लावतो.. गरम तेल पडून माझा हात भाजला होता, आठवतो? मी मलम चोपडून पडले होते.. तू शाळेतून आल्याबरोबर हे कळताच ओक्साबोक्शी रडू लागलीस.. तो मात्र शांत होता. त्याची काळजी त्याच्या डोळ्यातून दिसत होती. ‘‘पप्पा, माँचा हात पूर्वीसारखा होईल ना परत?’’ असं विचारताना एवढा वेळ निग्रहाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी दगा दिलाच! ते अश्रू अजून कुठे तरी हृदयावर कोरले गेलेत. त्या एका प्रसंगानं तुमची काळजी, तुमचं प्रेम, तुमच्या भावना, सारं सारं माझ्यापर्यंत पोहोचलं.. त्यानंतर मी कुठलीच गोष्ट वेंधळेपणानं नाही केली..
तुम्ही दोघांची फार फार सय येतेय गं. असं मन ढगाळलेले असताना अचानक दार अवेळी वाजलं, नि आठवणींचा पडदा दूर सारून मी उठले.. तर दारात तू उभी होतीस.. प्रत्यक्ष तू! मला काहीच न सुचून मी तुझ्याकडे नि तू माझ्याकडे मन भरून पाहत राहिलो.. नि तुला मिठीत सामावून घेताना मी भरून पावले!

  • अपूर्वा कर्पे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 1:09 am

Web Title: emotion and strongness in relations
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 शिकवणी
2 ‘एवढाच’ विचार
3 सत्कारणी विरंगुळा
Just Now!
X