शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. यामध्ये तान्हाजींच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण, उदयभान राठोडच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकरने साकारली आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच सावित्रीबाईंच्या भूमिकेमध्ये काजोलची झलकही या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. मंगळवारी सोशल नेटवर्किंग साईटवर याच ट्रेलरची चर्चा दिसून आली. मुंबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी कलाकारांनी संवाद साधला. यावेळेस अजयला पत्रकारांनी काजोलसंदर्भात एक प्रश्न विचारला असता अजयने त्यावर अगदी मजेशीर उत्तर दिले.

अजय देवगणचा शंभरावा चित्रपट असणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीने म्हणजेच काजोलनेच पदड्यावरही पत्नीची भूमिका साकारली आहे. या दोघांची चित्रपटातील कमेस्ट्रीची झलक ट्रेलरमध्ये दिसून आली. याचसंदर्भात अजयला पत्रकारांनी प्रश्न विचारला. “खऱ्या आयुष्यातील पत्नीबरोबर अनेक वर्षानंतर स्क्रीन शेअर करताना कसं वाटलं? काजोलबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता,” असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. यावर अजयने अगदीच मजेशीर उत्तर दिलं. “काजोलबरोबर काम करताना कसं वाटलं हे मी सांगू शकत नाही कारण तिच्याबरोबर सेटवर असल्यावर सेटवर नाही तर घरीच असल्यासारखं वाटायचं. आम्ही घरी जसं वागतो तसंच सेटवर वागायचो. त्यामुळे शुटींगदरम्यान विशेष काही वेगळं वाटलं नाही,” असं अजय म्हणाला. अजयचं हे उत्तर ऐकून मंचावर असणारे त्याचे सहकारी सैफ, शरद केळकर, ओम राऊत आणि रोहित शेट्टीलाही हसू आवरता आले नाही.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये अजयबरोबर सैफनेही पत्रकारांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरे दिली. १९९९ साली लग्नाच्या बेडीत अडकलेल्या अजय आणि काजोलने याआधी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये प्रमुख्याने ‘इश्क’, ‘प्यार तो हो ना ही था’, ‘राजू चाचा’, ‘गुंडाराज’, ‘हाल-ए-दिल’, ‘विघ्नहर्ता’, ‘यू मी और हम’, ‘हलचल’, ‘दिल क्या करे’ या चित्रपटांचा समावेश आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘टूनपूर का सुपरहिरो’ या चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं.