बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार राज मेहता दिग्दर्शित ‘गुड न्यूज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने एक खंत व्यक्त केली. मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात स्थान देत नाहीत असं त्याने म्हटलंय.
“मी नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करतो कारण मोठे दिग्दर्शक मला विचारत नाहीत. हे सत्य आहे. जेव्हा मोठे दिग्दर्शक तुम्हाला विचारत नाहीत तेव्हा तुम्हाला स्वत:चा वेगळा प्रवास सुरु करावा लागतो. जेव्हा तुम्हाला मोठ्या कंपनीत काम मिळत नाही तेव्हा तुम्हाला छोट्या कंपनीपासून सुरुवात करावी लागते. तिथून मोठ्या ठिकाणी जाता येतं. माझ्यात कौशल्य, प्रतिभा असूनही लोक मला का विचारत नाहीत म्हणून तुम्ही घरी बसू शकत नाही”, असं अक्षय म्हणाला.
मोठे दिग्दर्शक फक्त खानसोबतच काम करू इच्छितात का असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “जे लोक पात्रं आहेत त्यांच्याकडे मोठे दिग्दर्शक गेले. यामध्ये फक्त खानच नाहीत तर कपूर आणि इतरसुद्धा आहेत. कदाचित मी पात्र नसेन असं मला वाटतं आणि म्हणूनच मी माझा वेगळा मार्ग निवडला.”
मोठमोठे दिग्दर्शक जरी अक्षयला विचारत नसले तरी ते त्याच्या चित्रपटांची निर्मिती मात्र करतात. याबद्दल त्याने सांगितले, “मोठे दिग्दर्शक मला चित्रपटांसाठी विचारत नसले तरी मोठे निर्माते माझ्या चित्रपटांची निर्मिती करतात. करण जोहर, आदित्य चोप्रा यांना तुम्ही याबाबत विचारू शकता.”
नवोदित दिग्दर्शकांसाठी ‘जिंकू किंवा मरू’ अशी परिस्थिती असते, कारण जर त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत तर त्यांचं करिअर तिथेच संपतं, असंही तो सांगतो. त्याचप्रमाणे अशा दिग्दर्शकांचे चित्रपटांचे स्वीकारताना तो फक्त पटकथेवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. कारण त्यामुळेच ६० टक्के काम झालेलं असतं आणि उर्वरीत काम दिग्दर्शकाच्या हातात असतं, असं अक्षय मानतो.
अक्षयचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत करीना कपूर, दिलजीत दोसांज व कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.