दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील महामालिका कितीही एकसुरी आणि रटाळ असल्या तरी ठरावीक प्रेक्षकवर्ग असल्यानेच त्या वर्षांनुवर्षे टीआरपी टिकवून ठेऊ शकतात, हे वास्तव आहे. या दीर्घ मालिकांमुळे कलावंतांनाही नोकरी केल्यासारखे सलग काम मिळू लागले आहे. कारण आता आठवडय़ातून एखाद्-दुसरा दिवस वगळून किमान पाच ते सहा दिवस मालिकांचा रतीब टी.व्ही.वर सुरू असतो. या पठडीतली एक मालिका म्हणजे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है.’ ठाण्यातील अमन शर्मा हा १९ वर्षांचा तरुण गेली सात वर्षे या मालिकेत ‘अंशू’ या मुख्य नायिकेच्या लहान भावाची भूमिका करतोय. मध्यंतरीच्या काळात दोनदा काही काळासाठी ही मालिका बंद करण्यात आली. दरम्यान मालिकेतील अनेक कलावंत बदलले. मात्र ‘अंशू’ची भूमिका कायम अमनच करीत आहे. आता कथानकाच्या ओघात मालिकेतला हा अंशू लहानाचा मोठा झाला असून याच आठवडय़ात मालिकेत त्याचे चक्क लग्नही होणार आहे. ‘ये रिश्ता..’मध्ये जेव्हा अमनने काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा तो सातवीत होता आणि आता तो मिठीबाई महाविद्यालयात मास मीडियाच्या द्वितीय वर्षांला आहे. या सात वर्षांत त्याने मालिकेच्या तब्बल १४३५ भागांमधून भूमिका केली असून हा भारतीय दूरचित्रवाणी विश्वातला विक्रम मानला जात आहे. वसंत विहार शाळेत शिकणाऱ्या अमनने अभ्यास आणि मालिका या दोन्ही भूमिका व्यवस्थित वठवल्या. त्यामुळेच दहावीला त्याला ८५ टक्के आणि बारावीला ७९ टक्के गुण मिळाले आहे. ‘ये रिश्ता..’ व्यतिरिक्त ‘झी टी.व्ही.’वरील ‘चलती का नाम गाडी’, ‘एनडीटीव्ही इमॅजिन’वरील ‘चरित्र’, ‘लाइफ ओके’वरील ‘सावधान इंडिया’, ‘कलर्स’वरील ‘ऐसे करो ना वादा’ या मालिकांबरोबरच सध्या लोकप्रिय असलेल्या ‘महाभारत’ मालिकेत तो भीमपुत्राची भूमिका करीत आहे. याशिवाय कुणाल कोहलीसोबत तो एका आगामी चित्रपटातही दिसणार आहे.