News Flash

पुन्हा एकदा ‘केबीसी’

स्पर्धकांना प्रश्नाच्या उत्तराबाबत आडकाठी निर्माण झाल्यास ‘फोन-अ-फ्रेंड’ हा पर्याय वापरला जात होता.

अमिताभ बच्चन

‘कौन बनेगा करोडपती’ची हॉट सीट पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा केबीसीचे नवीन पर्व सुरू होणार आहे. केबीसीचे हे नववे पर्व असून स्पर्धेचे डिजिटल स्वरूप हे यंदाच्या पर्वाचे विशेष आर्कषण आहे. स्पर्धेची रंगत वाढवण्याकरता जॅकपॉटच्या अखेरच्या प्रश्नाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. तसेच संकटकाळात स्पर्धकांना स्पर्धेत टिकून ठेवण्याकरता मदत करणाऱ्या पर्यायांमध्येही बदल करण्यात आले आहेत. या शोच्या निमित्ताने माध्यमांसमोर आलेल्या अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी’ सोडून इतर कोणत्याही प्रश्नांवर उत्तरं देण्यात फारसा रस दाखवला नसल्याने आपले लक्ष्य सध्यातरी त्यांनी आपल्या कामावरच केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

‘उत्तर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे’ या घोषवाक्यासह सुरू झालेल्या जाहिरातीमुळे यंदाच्या केबीसीच्या पर्वाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या माणसांमध्येच जिंकण्याची खरी ताकद असते, अशी यंदाच्या पर्वाची संकल्पना आहे. केबीसीचे सूत्रधार अमिताभ बच्चन यांनादेखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यामुळे यंदाचे पर्व माझ्यासारख्या प्रथमदर्शी दुर्लक्षिलेल्या व्यक्तीकरता महत्त्वाचे असल्याचे अमिताभ बच्चन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवव्या पर्वाला अधिक स्पर्धात्मक बनवण्याकरिता केवळ ३० भागांमध्येच हा शो बांधण्यात आला आहे. स्पर्धात्मक वातावरण, रंजकता निर्माण करण्यासाठी शो कमी लांबीचा करण्यात आला असून मुख्य म्हणजे स्पर्धकांचे नशीब घडवणारा जॅकपॉटचा शेवटचा प्रश्न सात कोटी रुपयांचा करण्यात आला आहे. याशिवाय, स्पर्धकांचे संकटसमयी वापरले जाणारे पर्याय शिल्लक असतील तर ते जॅकपॉट प्रश्नाच्या वेळी रद्द केले जाणार आहेत.

डिजिटल वारे या शोपर्यंतही पोहोचले असून ‘जियो’ हा ‘केबीसी’चा मुख्य प्रायोजक असल्याने संपूर्ण पर्व डिजिटल करण्यात आले आहे. स्पर्धकांना प्रश्नाच्या उत्तराबाबत आडकाठी निर्माण झाल्यास ‘फोन-अ-फ्रेंड’ हा पर्याय वापरला जात होता. यापुढे हा पर्याय ‘व्हिडिओ-अ-फ्रेंड’ करण्यात आला आहे. ज्याद्वारे स्पर्धक व्हिडिओद्वारे आपल्या उत्तरदात्याशी संपर्क साधू शकणार आहेत. याशिवाय स्पर्धकांना विशिष्ट रकमेची पातळी पार केल्यानंतर देण्यात येणारा धनादेशही डिजिटल करण्यात आला असून यापुढे ‘डिजिटल करन्सी’द्वारे विजेत्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. २८ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ‘सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन’ या वाहिनीवरून ‘केबीसी’ची ही जुगलबंदी रंगणार आहे.

यावेळी अमिताभ बच्चन यांना शोशिवाय अनेक प्रश्न विचारण्यात आले मात्र त्यांनी यावर उत्तरं देण्यात फारसा रस दाखवला नाही. तर ‘केबीसी’च्या आठवणीच सांगायच्या तर या शोला १७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शोच्या स्मृतींना उजाळा देणारा खास भाग प्रसारित झाला असल्याने त्याबद्दलही ते फारसे बोलले नाहीत. यावेळी शोचे बदललेले स्वरूप खुद्द अमिताभ यांच्यासाठीही आकर्षणाची बाब ठरली आहे. यावेळी नवीन पर्यायांचा समावेशही शोमध्ये करण्यात आला आहे. जोडीदार हा नवीन पर्याय स्पर्धकांना स्पर्धेत टिकून राहण्याकरता मदत करणार आहे. ज्याद्वारे स्पर्धक एखाद्या जवळच्या व्यक्तीला हॉटसीटवर घेऊन येऊ शकणार आहे. तसेच काही खास भागांमध्ये सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याऐवजी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात येणार आहे. केबीसीच्या या पर्वाकरिता सात दिवसांत १ कोटी ९८ लाख लोकांनी नोंदणी केल्याची माहिती सिद्धार्थ बसू यांनी दिली. ‘जियो’च्या ग्राहकांना देखील शोमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या आहेत. टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या खेळामध्ये थेट घरबसल्या सहभागी होण्याची संधी जियो ग्राहकांना मिळाली आहे. प्ले अलाँग या पर्यायाद्वारेही ते हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांच्या ज्ञानाशी तुलना करू शकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 1:51 am

Web Title: amitabh bachchan back with lot of innovations in kaun banega crorepati
टॅग : Kaun Banega Crorepati
Next Stories
1 पडद्यामागचा उत्सव
2 ‘अर्धसत्य’ कथित राष्ट्रवादाचे उन्मादी क्षोभनाटय़
3 प्रशांत दामलेंची ‘स्पेशल भेट’
Just Now!
X