देशात करोनाची दुसरी लाटेने हाहाकार माजला होता. महाराष्ट्र राज्य सरकारनेही टीव्ही मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंदी घातली होती. त्यामुळे बऱ्याच मालिका आणि चित्रपटांचे काम ठप्प झाले होते. सरकारने जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये करोना नियमांचे पालन करत टीव्ही आणि चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देण्यात आल्यानंतर बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी लवकरच काम सुरू करणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यांना करोना झाल्यानंतरचा क्वारंटाईन काळातला अनुभव देखील त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोना रूग्ण संख्येत झालेली घट पाहून बिग बींनी दिलासा व्यक्त केला. सोबतच लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या कामाला सुरवात करणार असल्याचं सांगत असतानाच करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरात विस्कळीत झालेल्या परिस्थितीबाबत देखील काही गोष्टी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहिलं, “घरात काम करणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला आत बाहेर जाण्यासाठीची परवानगी नव्हती. घरातली परिस्थिती खूप बिघडली होती. करोना टेस्ट झाल्यानंतर एकदा घरात आलो तर घरातच रहावं लागलं होतं. घरात मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझर लावणे या करोना नियमांचं पालन अगदी काटेकोरपणे केलं जात होतं.” बिग बींनी लिहिलेल्या या ब्लॉगचं फॅन्स कौतूक करत  आहेत. तसंच त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा देखील देताना दिसून आले आहेत.

बिग बींनी करोना काळात घरच्या परिस्थितीबाबत सांगतानाच त्यांच्या कामाबद्दल ही गोष्टी शेअर केल्या. त्यांचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’च्या शूटिंगचं काम देखील ठप्प झालं होतं. याबद्द्ल सांगताना त्यांनी लिहिलं, “माझी पूर्ण शूटिंगची टीम सुद्धा उद्यापासून कामाला लागणार आहे. प्रोडक्शन हाऊसद्वारे सर्व कामगार आणि कलाकारांना करोना लस देण्यात आली आहे आणि शक्य तितकी जास्त सावधानता बाळगण्यात येतेय. सर्व कॅमेरे शॉर्ट ब्रेक नंतर सॅनिटाइज करण्यात येत आहेत. तसंच स्टुडिओच्या आत येण्यापूर्वी सर्वांची चाचणी करण्यात येतेय. ठराविक दिवसानंतर सर्वांची चाचणी करण्यात येतेय. जे व्यक्ती करोना संक्रमित आहेत, त्यांना स्टुडिओमध्ये येण्यासाठी बंदी घातली आहे. त्यांना घर किंवा रूग्णालयात पाठवण्यात येतंय.”

अभिषेक बच्चन यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, या चित्रपटाच्या शूटिंगचं अर्ध राहिलेलं काम उद्यापासून सुरू होणार आहे.