बॉलिवूड गायक अनु मलिकवर #Metoo मोहिमे अंतर्गत लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले होते. पण अतिरिक्त पुरावे न मिळाल्यामुळे त्यांच्यावरील खटला बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे (national commission for women) अनु मलिक विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. पण आता पुरावे न मिळाल्याने हा खटला बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनु मलिक यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार अनु मलिक यांच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने खटला बंद करण्यात आला आहे. ‘एखाद्या महिलेने पुन्हा अनु मलिक यांच्या विरोधात पुरावे सादर केले तर खटला पुन्हा सुरु करण्यात येईल’ असे राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत #Metoo मोहिमेला सुरुवात झाली होती. नाना पाटेकरांसोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. तसेच अनु मलिकवरही आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे अनुमलिक यांना रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल पर्व १० मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण इंडियन आयडॉल पर्व ११मध्ये पुन्हा त्यांची एण्ट्री झाली. त्यांच्या एण्ट्रीने सोशल मीडियावर खळबळ उडवली. त्यामुळे नंतर अनु मलिकने स्वत: शोमधून काढता पाय घेतला.

श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रा यांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परंतु या सर्व आरोपांचे अनु मलिक यांनी खंडन केले.